आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आदेश : मुंबई, पुण्यासाठी असलेले नियम लागू
नागपूर: कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशभरासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर झाले आहे. लॉकडाऊन 3.O मध्ये केंद्र आणि राज्य शासनाने झोननिहाय काही शिथिलता जाहीर केली आहे. मात्र, नागपूर शहर हे ‘रेड झोन’ मध्ये असल्याकारणाने येथे कुठलही शिथिलता राहणार नाही. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होत्या, त्याच कायम राहतील. यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत.
या आदेशात नमूद केल्यानुसार, सरकारी आस्थापना अथवा खासगी कार्यालयांना ३० टक्के कर्मचारी संख्या ठेवून कार्य सुरू करण्यास नागपुरात पुढील आदेशापर्यंत बंदी कायम राहील. वाईन शॉप किंवा अन्य कुठलीही दुकाने नागपूर महानगरपालिका हद्दीत सुरू होणार नाहीत, असे आदेशात नमूद केले आहे. लॉकडाऊन ३ मध्ये मुंबई, पुणे शहरासाठी जे नियम लागू आहेत तेच नियम नागपूर शहरासाठी लागू राहतील. त्यामुळे नागरिकांनी कुठलाही संभ्रम ठेवू नये. लॉकडाऊन-२ प्रमाणेच लॉकडाऊन -३ मध्ये नियम लागू राहतील. हे सर्व नियम पाळत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन पाळावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर रेड झोनमध्ये असल्याने नागरिकांच्या आरोग्यासाठी ही काळजी घेणे आवश्यक आहे. नियम किती लवकर शिथिल करायचे ते आता नागरिकांनाच ठरवायचे आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊन 3.O’ चे काटेकोर पालन करा आणि नागपूरचे व्यवहार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले आहे