Published On : Wed, Mar 25th, 2020

लॉकडाऊन’ दरम्यान रस्त्यावरील लोकांना ‘बेघर निवाऱ्या’चा आसरा

Advertisement

स्वच्छतेचे धडे : लाभार्थ्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी

नागपूर: नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग आणि दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘लॉकडाऊन’दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शहरात असलेल्या पाचही बेघर निवाऱ्यांमध्ये नेण्यात येत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचीही या बेघर निवाऱ्यामध्ये विशेष काळजी घेतली जात आहे. राज्यातील विविध महानगरपालिकांच्या अख्यत्यारीत असलेल्या अशा बेघर निवाऱ्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील लोकांना नेऊन लाभार्थ्यांची विशेष काळजी घेणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यात पहिली ठरली आहे.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी शहरातील प्रत्येक घटकावर लक्ष केंद्रित केले जात आहे. रस्त्यावर राहणारे बेघर अर्थात शहरी बेघर निवाऱ्यातील लाभार्थी हे त्यातलेच एक होय.

नागपूर शहरात सीताबर्डी येथील बुटी कन्या शाळा, टिमकी भानखेडा येथील हंसापुरी प्राथमिक शाळा, डिप्टी सिग्नल येथील गुरु घासीदास समाज भवन, नारा रोड येथील मनपा ग्रंथालय आणि समाजभवन तसेच टेकडी गणेश मंदिराजवळील रेल्वे स्थानक पुलाच्या खाली असे पाच शहरी बेघर निवारा आहेत.


‘लॉकडाऊन’ची घोषणा होताचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्त्यांवरील बेघरांना तातडीने बेघर निवाऱ्यात नेण्याचे आदेश दिले. त्यानुसार यंत्रणेने बेघरांना तेथे नेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे धडे दिले जात आहे. कोरोना विषाणूसंदर्भात संपूर्ण माहिती व घ्यावयाची काळजी शासनाच्या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पाचही निवाऱ्यांमधील लाभार्थ्यांना निवाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्यास सांगण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी हात कसे धुवायचे याची प्रात्यक्षिके निवारा कर्मचाऱ्यांमार्फत करून दाखविण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याचीही माहिती दिली जात आहे. मास्कविषयी माहिती देऊन मास्कही उपलब्ध करून दिले जात आहे.

सध्या नागपुरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे वृद्ध बेघरांसोबतच सर्व बेघर लाभार्थ्यांना मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. भोजनसमयी तीन फुटाचे अंतर ठेवून बसविण्यात येत आहे. त्यांना बाहेर न निघण्याविषयी विनंती करण्यात येत आहे. ज्या बेघरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल अशांची विशेष काळजी घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे व आवश्यक तो औषधोपचार करण्यात येत आहे.

सर्व बेघर निवाऱ्यांमछ्ये कीटकनाशक फवारणी करण्यात यावी यासंदर्भात नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडे विनंती अर्ज करण्यात आला आहे. पाचही निवाऱ्यांमध्ये सुमारे ३०० बेघर व्यक्ती असून कोव्हिड-१९ बाबत जाणीव जागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.

या बेघर निवाऱ्यांमध्ये भोजनाच्या व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. यासाठी उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे (मो.क्र.- ९७६५५५०२१४) आणि दीनदयाल अंत्योदय योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रमोद खोब्रागडे (मो.क्र. ९९२२०९३६३९) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement