Published On : Mon, Apr 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात लोकसभेची लढाई होणार अटीतटीची;गडकरी विकासाच्या मुद्द्यावर मागणार मते तर काँग्रेसने उचलून धरला रोज़ी-रोटीचा मुद्दा !

Advertisement

नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर मतदारसंघात अटीतटीचा सामना रंगला आहे.नागपूर हा काँग्रेसचा भूतपूर्व बालेकिल्ला मनाला जातो. तर गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने नागपुरात विजय मिळवला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बहुमताने विजयी झाले आहे. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत गडकरी यांच्यासमोर काँग्रेसने विकास यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.नागपुरात एकीकडे बेरोजगारी, महागाई,मूलभूत सुविधांचा अभाव,स्थानिक समस्यांबद्दल नागरिकांची ओरड सुरु आहे. हे पाहता जनमनाच्या कसोटीवर कोणता नेता बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नितीन गडकरींना जिंकण्याचा आत्मविश्वास –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एक राष्ट्रीय नेते आहेत. गडकरी यांचा नियमितपणे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो आणि नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या विकासकामांवर आणि गेल्या दोन टर्ममध्ये त्यांनी नागपुरात केलेल्या विकासकामांच्या आधारावर ते यंदा लोकसभा निवडणुकीत मतं मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजयाबद्दल काही शंका नाही पण नागपुरात भाजपला ७५% मते मिळावीत यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे, असा आत्मविश्वास गडकरी यांनी नागपुरातील एका मेळाव्यात व्यक्त केला.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये नागपूरचा समावेश आहे.

विकास ठाकरे देणार गडकरींना टक्कर –
नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी यांना ‘काटे की टक्कर’ देण्यासाठी काँग्रेसने विकास ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.गडकरी विरोधात निवडणूक लढण्यासाठी विकास ठाकरे हे तगडे उमेदवार असून यंदा काँग्रेसचाच विजय निश्चित असल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या म्हणणे आहे. ठाकरे हे नागपूरचे माजी महापौर म्हणून एक लोकप्रिय व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडे एक सुलभ नेता म्हणूनही पाहिले जाते. सध्या ते नागपूर पश्चिमचे आमदार आहेत.

. नागपुरातील लोकांना नोकऱ्या, महागाई आणि पाणी, वीज या नागरी सुविधांची चिंता आहे. नागरी संस्था भाजपकडे आहेत, पण ते अजूनही पाणी देऊ शकलेले नाहीत आणि रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. सर्वत्र सिमेंट-काँक्रीट टाकून विकास होत नाही. तरुणांना नोकऱ्यांची गरज आहे आणि रहिवाशांना वेळेवर पाणी आणि माफक दरात वीज हवी आहे. ते सर्व देण्यात भाजप अपयशी ठरला असल्याचा घणाघात ठाकरे यांनी केला.

यावेळी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी (VBA), बहुजन समाज पार्टी (BSP) आणि AIMIM यांचा मोठा पाठिंबा मिळण्याची आशा आहे. कारण नागपुरात तिन्ही पक्षांनी उमेदवार दिलेला नाही. 2019 मध्ये, AIMIM सोबत युती असलेल्या VBA आणि BSP ला 57,943 मते किंवा जवळपास 5% मते मिळाली. हे लक्षात घेऊन ठाकरे हे शहरातील दलित आणि मुस्लिम भागात जोरदार प्रचार करत असून त्यांना कुणबी (ओबीसी) समाजाच्या पाठिंब्यावरही लक्ष आहे. काँग्रेसच्या आतील सूत्रानुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विदर्भातील कुणबी समाज भाजपवर नाराज आहे आणि ते ठाकरे यांच्या बाजूने मतांचा कौल देऊ शकतात, असा विश्वास काँग्रेसला आहे.

नागपूर टुडेने साधला वरिष्ठ पत्रकारांशी संवाद-
दरम्यान नागपूर टुडेने लोकसभा निवडणुकीत गडकरी आणि ठाकरे यांच्यापैकी कोण बहुमताचा आकडा गाठणार यासंदर्भात वरिष्ठ पत्रकारांशी संवाद साधला.सुप्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांनी ‘नागपूर टुडे’ शी बोलताना म्हणाले की,नितीन गडकरी आणि विकास ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये होणारी लढत ही चुरशीची असेल. फार कमी लिडने गडकरी निवडणूक जिंकू शकतात.

दैनिक भास्कर’चे रघुनाथ लोधी यांनी नागपूर टुडेशी केलेल्या विशेष चर्चेत सांगितले की, या लोकसभा निवडणुकीत गटबाजी शिगेला पोहोचली असून, या निवडणुकीतही दुफळी कायम राहणार आहे. या गटबाजीचा सर्वाधिक फटका काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना बसू शकतो. बाकी मतदारांचे स्वतःचे मत आहे. ते त्यांच्या विवेकबुद्धीनुसार ज्याला पाहिजे ते निवडू शकतो. तसेच एआयएमआयएमच्या अनुपस्थितीत गडकरींच्या विजयाचे अंतर कमी होईल,अशी शक्यता पत्रकार सुदर्शन चक्रधर यांनी व्यक्त केली.

नागपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी निकराची लढत होण्याची शक्यता प्रसिद्ध पत्रकार रामू भागवत यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना ‘अंडरडॉग’ म्हणजेच प्रतिस्पर्धी उमेदवार असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे यांना भागवत यांनी भाजपचे नितीन गडकरी यांच्या तुलनेत कनिष्ठ असे वर्णन केले असले तरी, त्यांनी ही एकतर्फी लढत मानण्यास नकार दिला. भागवत यांनी स्पष्ट केले की लोकशाहीत आपण कोणाच्याही विजयाचा दावा करू शकत नाही.

सर्वसामान्य नागरिकांचीही जाणून घेतली मते –
नागपुरात मोठे उड्डाणपूल आणि मेट्रो लाईन्स आहेत.हे सर्व दर्जेदार दिसते.पण त्यामुळे आमचे प्रश्न सुटलेले नाहीत.नागरी सुविधा कमी आहेत,पाणीकपातीचा मोठा प्रश्न आहे आणि वीजेचे शुल्क जास्त आहे, असे म्हणत काहींनी विकास ठाकरेंना पाठिंबा दिला.तर एकाने गडकरींनी केलेल्या पायाभूत सुविधांच्या कामाची प्रशंसा केली. त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डमुळे ते पुन्हा जिंकू शकतात. परंतु नागरी सुविधांचा अभाव आणि बेरोजगारी या प्रमुख समस्या आहेत ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे,असेही ते म्हणाले.

-आरती सोनकांबळे

Advertisement
Advertisement