महापौर संदीप जोशी यांचा संतप्त सवाल
नागपूर: सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. मात्र या ऑनलाईन परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळखंडोबाच आहे. कधी ऐन परीक्षेच्या क्षणी विद्यार्थ्यांना ओटीपी येत नाही तर कधी लॉग इन मध्ये अडथळे येत आहेत. परीक्षेच्या नावाने विद्यार्थ्यांची क्रुर थट्टा केली जात आहे. एकंदरीत ही विद्यापीठाची परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी पोरखेळ मांडला आहे, असा संतप्त सवाल नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यात मद्यालये (बार) सुरू केले आहेत. दुसरीकडे करमणुकीसाठी थिएटर प्रारंभ करण्याचेही चाललेले आहे. असे असताना विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यात नेमकी काय अडचण आहे. ऑनलाईन परीक्षेचा हा सगळा सावळागोंधळ करण्याऐवजी सोशल डिस्टंनसिंगचे पालन करीत विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी आणि पालक मंडळी यांना यामुळे मोठा दिलासा मिळेल, असे महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.
सध्या सर्वच विद्यार्थ्यांची विशेषतः अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यातून मार्ग काढण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीचा अभ्यास करावा, अशी सूचनाही महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.
हेल्पलाईन कुठे आहे?
विद्यापीठातर्फे ॲपद्वारे परीक्षा घेतल्या जात आहेत. ॲप कुचकामी, परिणामी होणारा विद्यार्थ्यांचा गोंधळ, अशा सर्व परिस्थितीत हेल्पलाईन हा मोठा आधार राहतो. मात्र विद्यार्थ्यांना या हेल्पलाईनवरही प्रतिसाद मिळत नाही, मग ही हेल्पलाईन काय कामाची? असा संतप्त सवालही महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.