नागपूर : शहरातील गोर-गरीब रुग्ण कमी पैसे लागतील म्हणून नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचार घेत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात रुग्णांची लूट होत असल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला आहे. मेडिकल रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून ५०० रुपये शुल्क आकारून १२० रुपयांचीच नोंद करण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. मेडिकलमध्ये बीपीएल रुग्णांवर मोफत, इतरांवर कमी दरात उपचार होतात.
गैरबीपीएल रुग्णांना चाचण्या, खाटा व इतर सेवांचे शुल्क भरावे लागते. रुग्णांच्या सुटीच्या कार्डावर ५०० रुपये शुल्क भरायचे असल्याचच त्यांना ते द्यावे लागते. मात्र सुटीच्या कार्डावर ५०० रुपये शुल्क भरायचा शेरा नसल्यानंतरही त्यांच्याकडून ते आकारण्यात येत असल्याचा प्रकार सुरु आहे.
रुग्णाला पाचशे रुपयांची पावती द्यायची आणि मेडिकलच्या नोंदीत केवळ १२० रुपये नोंदविण्यात येत होते. एका रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडल्यानंतर हा घोटाळा बाहेर आला. अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात ऑनलाईन पद्धतीने त्याच्या दोन पावत्या तयार झाल्याचे पुढे आले. ५७० रुपयांच्या पावती क्रमांकावर लिपिकाने ऑफिस कॉपी असलेल्या पावतीमध्ये केवळ १२० दाखवले आणि मेडिकलच्या खात्यामध्ये ते जमा केले. हे पाहता त्या कर्मचाऱ्याने एका रुग्णांकडून ४५० रुपये या कर्मचाऱ्याने चोरी करून ते खिशात घातले.
गेल्या तीन महिन्यांपासून मेडिकलमध्ये हा प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे. या शुल्क घोटाळ्याची दखल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी घेतली आहे. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, डॉ. मोहमद फैजल, डॉ. मनीष ठाकरे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीकडून चौकशीही सुरू केली. आतापर्यंत या समितीकडून १२ कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून हे कर्मचारी मेडिकलच्या खिडकी क्रमांक ६६ मध्ये काम करतात.