नागपूर : – विक्रेत्यांचाच जोरदार मागणीमुळे येत्या ऑगस्ट पासुन राज्याची ऑनलाईन लॉटरी बाजारात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्य शासनातर्फे करण्यात आल्याची माहिती लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते विलास कृ साताडेँकर यांनी दिली. महाराष्ट्रभरात सुरू झालेल्या पावसाची पर्वा न करता राज्य भरातील तळागाळातील सरकारी अधिकृत लॉटरींची विक्री करणार्या विक्रेत्यांनी सोमवारी सकाळी नागपूर अधिवेशनावर धडक दिली आणि जाब विचारला! लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते विलास कृ. साताडेँकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे हल्लाबोल आंदोलन अखेर यशस्वी झाले! लॉटरी विक्रेत्यांच्या मागण्यासाठी साताडेँकर यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला असुन विक्रेत्यांची एकजुट केली आहे त्याचे विशाल दर्शनच या निमित्ताने नागपुरात झाले.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर साताडेँकर पत्रकारांशी बोलत होते. आॅनलाईन लाॅटरी सोबतच विक्रेत्यांच्या विविध मागण्यांनाही मान्यता मिळाली आहे. विक्रेत्यातफेँ सरकारला सात कलमी निवेदन देण्यात आले.
१)गेली वर्षभर लादण्यात आलेल्या ‘जी. एस टी’ च्या ग्रहणातुन विक्रेत्यांची मुक्तता करावी सरसकट हे संकट न लादता १२ टक्क्यांवर आणावे. त्याखेरीज ऑनलाईन लॉटरीची विक्रीची घसरण हटणार नाही.
२)बदलत्या काळात तरुण ग्राहकांनी उत्कृष्ट ठरणारी सरकारी ऑनलाईन लॉटरी तत्काळ सुरु करावी. त्यामुळे परराज्यात जाणारा महसूल हा आपल्या राज्यातच खेळता राहील.
३) राज्यातील प्रत्येक एसटी डेपोच्या आवारात सरकारी लॉटरी विक्रेत्यांना स्टॉल उभारणीसाठी जागा उपलब्ध करावी, त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल.
४) लॉटरी तिकीटांच्या यंत्रणेत पारदर्शकता आणि विक्रेत्यांसाठी कमिशन वाढ मिळावे.
५)महानगर पालिका, जिल्हा परिषद क्षेत्रातील फेरीवाला झोन मध्ये आरक्षित जागा व परवाना मिळावा.
६) लॉटरी धंद्याला प्रतिष्ठा मिळावी यासाठी उद्योगाचा दर्जा मिळावा
७)लॉटरी मंडळावर(बोर्ड) संघटनेच्या प्रतिनिधीचा सहभाग, विक्रेत्यांना शासकीय ओळखपत्र लॉटरी उद्योगासाठी बेरोजगारांना अनुदान व विशेष अर्थ सहाय्य मिळावे. लाक्षणिक उपोषणाची सांगता यशवंत स्टेडियमवर उभारण्यात आलेल्या निदर्शने मंडपात रविवार रात्री पासूनच विक्रेत्यांनी एकच गर्दी केली होती. काळ्या फिती लावून आणी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
महाराष्ट्राची ऑनलाईन तत्काळ सुरु झालीच पाहिजे लॉटरी साठी फक्त आश्वासने नकोत आता परिपूर्ण धोरण ठरवुया दिवसभराच्या लाक्षणिक उपोषणाची सायंकाळी लॉटरीचे नेते विलास कृ. साताडेँकर आणि नागपूर जिल्हा अध्यक्षा सौ. मनीषा पापडकर यांच्या उपस्थितीत भाजपचे नेते जितेंद्र राऊत यांच्या हस्ते सरबत पाजून उपोषणाची सांगता झाली. यावेळी लॉटरी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीचा वृतांत कथन केला.
ऑगस्ट मध्ये ऑनलाईन लॉटरी सुरू करण्याच्या निर्णयांमुळे विक्रेत्यानी आनंद व्यक्त केला आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सरबत पाजून दिवसभर चाललेले उपोषण संपल्याचे जाहीर करण्यात आले. संघटनेचे उपाध्यक्ष अनुज बाजपेयी,सरचिटणीस राजेश बोरकर, राकेश उंबळकर नागपूरचे प्रतिनिधी नितेश जैन, दिनेश करमचंदानी औरंगाबादचे विलास खंडेलवाल, सिंधुदुर्गचे संजय सावंत, अमरावतीचे सचिन धानुरकर, रत्नागिरीचे गुरुनाथ तोडणकर, कोल्हापूरचे केसरकर, ठाण्याचे महेश कोळी, पुण्याचे सुराणा, नाशिकचे वासुदेव पिल्ले आदी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
हल्ला बोल आंदोलनाचे वैशिष्टे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्य़ातल्या विक्रेत्यांच्या प्रतिनिधीचे या आंदोलनात सहभाग होता. पूरपरिस्थिती असलेल्या विभागातुनही विक्रेते उपलब्ध यंत्रणेतुन प्रवास करून नागपूर मुक्कामी दाखल झाले, विविध संघटना व राजकीय पक्ष यांचा आधार न घेता स्वयंस्फूर्तीने विक्रेते प्रथमच एकवटले होते. लाक्षणिक उपोषण करण्यासाठी वयोवृद्ध आणि तरुण विक्रेत्यांची एकच गर्दी झाली होती. काळ्या फिती लावून निषेध नोंदविला शिस्तबद्ध व शांततापूर्ण आंदोलनाबद्दल पोलीस व शासकीय अधिकाऱ्यांतर्फे आंदोलकाचे कौतुक झाले आम्ही सरकारला महसूल जमा करून देतो त्यासाठी विक्रेत्यांकडे लक्ष द्या, लॉटरीसाठी नवे धोरण ठरवा, दिशा ठरवा. अशा उत्स्फूर्त घोषणा विक्रेते देत होते. सरकारचे लक्ष वेधण्यासाठीचे आंदोलन यशस्वी केल्या बद्दल लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते विलास कृ. साताडेँकर यांनी प्रत्येक विक्रेत्यांची भेट घेऊन आभार मानले.