नागपूर – इंस्टाग्रामवरुन मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका आयपीएस अधिकाऱ्याने डॉक्टर तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात संबंधित आयपीएस अधिकारी दर्शन (वय ३०, रा. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो नंदूरबार जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे. गुन्हा दाखल होताच त्याने पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेमाचे आमिष देत केला लैंगिक छळ-
नोव्हेंबर २०२२ मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना डॉक्टर पीडितेची इंस्टाग्रामवरुन दर्शनसोबत ओळख झाली. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दर्शन बेरोजगार असताना पीडितेने त्याला आर्थिक मदतही केली. त्याच्या आईच्या आजारपणात उपचार करून हॉस्पिटलचे बिलही भरले.
आईच्या मृत्यूनंतर दर्शनने पीडितेला केरळला फिरायला नेले आणि तेथे हॉटेलमध्ये तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर नागपुरातील एका हॉटेलमध्येही तसाच प्रकार केला.
IPS झाल्यावर केली फसवणूक-
दरम्यान, दर्शन याची UPSC परीक्षेतून IPS अधिकारी म्हणून निवड झाली. हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी असताना पीडितेने त्याची भेट घेतली. तेथेही त्याने तिचे शोषण केले. जेव्हा तिने लग्नासाठी आग्रह धरला तेव्हा त्याने तिला नकार दिला आणि जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाणही केली.
दोन वर्षांच्या छळानंतर शेवटी पोलिसांत तक्रार-
पीडितेने दोन वर्षे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केल्यानंतर इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दर्शन याच्याविरोधात बलात्कार, फसवणूक, शिवीगाळ आणि मारहाणीचे गुन्हे नोंदवले आहेत.सध्या पोलीस दर्शनचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.