नागपूर : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. राजनगर परिसरातील सुराणा ले आऊटमध्ये दिवसाढवळ्या घरात शिरून विनय सॅम्युअल पुणेकर नावाच्या व्यक्तीही गोळ्या झाडून खून करण्यात आला. याप्रकरणाचा पोलिसांनी २४ तासाच्या आत छडा लावला. मैत्रिणीशी संबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने दोन गोळ्या झाडून विनय पुणेकर याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून आरोपी अद्याप फरार आहे. शनिवारी (ता.२४ ) दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास पुणेकर याची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती.
‘लव्ह ट्रायअँगल’ ठरले कारण,महिलेला अटक-
पोलिसांनी या प्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेला अटक केली आहे. हेमंत शुक्ला(वय ३५, रा. आजमगड) असे फरार मुख्य आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील कटनी येथील सासर असलेल्या मिनाक्षी यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. हेमंत शुक्ला आणि महिलेत प्रेमसंबंध होते. हेमंत हा तिच्यावर वारंवार संशय घ्यायचा. सोशल मिडियावरील सर्वच खात्याच्या ‘एक्सेस’ मिळविला होता. त्यामुळे त्या कुणाशी बोलतात याची माहिती त्याला मिळत होती. त्यातूनच महिलेच्या फेसबुक खात्याच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या विनयवर त्याला शंका आली. सहा महिन्यांपूर्वी महिला नागपुरात आपल्या माहेरी राहायला आली. त्यानंतर विनय आणि तिची जवळीक वाढली.त्यामुळे रागाच्या भरात हेमंतने विनयचा गोळ्या झाडून खून केल्याची माहिती आहे. हेमंत अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे, पोलिस उपायुक्त राहुल मदने, साहाय्यक पोलिस आयुक्त माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक किशोरी माने, उपनिरीक्षक नारायण घोडके, अभिजित चिखलीकर, निलेश घोगरे, हेड कान्टेबल यादव, भगत, मोहन आणि चमुने तपास सुरू केला.पथकाने कॉल डिटेल्सवरून महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले.