पॉवर मॅपचे उद्घाटन
नागपूर: सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील गरीब लोकांसाठी माधवबाग पॉवर मॅपचा उपयोग व्हावा. संस्थेने यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
माधवबाग पॉवर मॅपचे आज ना. गडकरी यांच्या हस्ते आभासी कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- डॉक्टरांसाठी आरोग्याचे विश्लेषण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावरून डॉक्टरांना रुग्णांच्या आजाराचे निदान करणे सोपे होते. म्हणून या मॅपचे महत्त्व अधिक आहे. देशासाठी आज ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करणे खूप गरजेचे आहे. कारण कोविडमुळे अनेक समस्यांचा सामना देशवासियांना करावा लागला. या काळातच नवीन संशोधनाची आवश्यकता जाणवू लागली. नवीन संशोधनाची गरीब रुग्णांना मदत व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शासनाने अधिकाधिक लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत पुढाकार घेतला असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आरोग्य सुविधांसाठी आरोग्य विमा असावा, हेही महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा पध्दतीचा आरोग्य विमा असणे आवश्यक आहे.
या पॉवर मॅपच्या माध्यमातून डॉक्टरांना रुग्णांची सर्व माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे नेमके कोणते औषधोपचार आवश्यक आहेत, हेही कळणार आहे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.