नागपूर: ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, म्हाडाचे सदस्य व वेगळ््या विदर्भाचा पुरस्कार करणारे अग्रणी नेते मधुकरराव किंमतकर यांचे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास नागपुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना ३० डिसेंबरपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. ते ८६ वर्षांचे होते.
रामटेक येथे १० आॅगस्ट १९३२ साली त्यांचा जन्म झाला. १९८० मध्ये त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव साठे, अॅड. मुरलीधर भंडारे यांच्या पुढाकाराने काँग्रेस (आय) चे तिकीट मिळाले आणि ते त्या निवडणुकीत विजयी झाले. वेगळ््या विदर्भाची मागणी १९८० पासूनच त्यांनी लावून धरली होती. १९८२ साली बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा मंत्री म्हणून समावेश झाला. वित्त व नियोजन, कामगार, विधी व न्याय या खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.
म्हाडाच्या अध्यक्षपदीही त्यांची १९९२ साली नेमणूक करण्यात आली. विदर्भ वैधानिक महामंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
रामटेक परिसरातील नागरिकांची सेवा करण्याचा त्यांचा वसा अखेरपर्यंत कायम होता. अलीकडेच त्यांना रामटेक भूषण या सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.