Advertisement
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात 2023 मध्ये मद्यपींनी 2.57 कोटी लीटर देशी दारू, 1.65 कोटी लीटर विदेशी दारू आणि 1.16 कोटी लीटर बिअर रचल्याचा आकडा समोर आला आहे. याचा परिणाम मद्यातून मिळणाऱ्या महसुलावरदेखील झाला असून, वर्षागणिक दारू रिचविण्याचा आकडा वाढत आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत नागपुरात 2,57,64,542 लीटर देशी दारू, 1,65,86,537 लीटर विदेशी मद्य आणि 1,16,88,496 लीटर बिअर नागरिकांनी रिचवली आहे.
नागपुरात धूम्रपान आणि मद्यपान एक ट्रेण्ड झाला आहे. थर्टीफर्स्ट असो किंवा कोणताही आनंदोत्सव जिकडे तिकडे दारू पिऊन जल्लोष साजरा करण्याची प्रथा पडली आहे. तीन महिन्यांत जेवढी दारू विकली जात नाही त्याहूनही अधिक दारू एकट्या ३१ डिसेंबरला पिण्यात येते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यातून मिळविला कोट्याविधींचा महसूल –
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यातून एप्रिल ते डिसेंबर २०२३ दरम्यान एकंदरित 532.64 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, आकडेवारीवरून असे दिसून येते की नागपुरात मद्याचा वापर सातत्याने वाढत असल्याने महसुलातही सातत्याने वाढ होत आहे.
सरकारने वाढवला दारूवरील व्हॅट –
महाराष्ट्रातील हॉटेल्स, बार, लाउंज आणि क्लबमधील दारूवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) 5 टक्के वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.त्यामुळे महाराष्ट्रात 1 नोव्हेंबरपासून हॉटेल, बार, लाउंज आणि क्लबमध्ये दिले जाणारे मद्य (Liquor) महाग झाले आहे.मात्र राज्य सरकारचा हा निर्णय बार आणि रेस्टॉरंट मालकांना पटले नाही.
रेस्टॉरंट आणि बार मालकांचे आंदोलन –
नागपुरातही वाढीव व्हॅटच्या निषेधार्थ जिल्ह्यातील बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांनी सिव्हिल लाइन्समधील संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली. आंदोलकांनी राज्य सरकारने व्हॅट वाढ मागे घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. या आंदोलनात हजाराहून अधिक बार आणि रेस्टॉरंट मालक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. याशिवाय अनेक बार आणि रेस्टॉरंट मालकांनीही सायंकाळच्या सुमारास बार बंद केले होते. मात्र हा वाद वर्षाच्या अखेरीस आला असला तरी, यामुळे दारूप्रेमींना त्यांच्या जीवनातील प्रेमापासून दूर ठेवण्यात अपयश आले.
– शुभम नागदेवे