मुंबई: राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ तसेच बॉम्बे हॉस्पिटलचे मानद अधिष्ठाता पद्मविभूषण डॉ. बी के गोयल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
डॉ गोयल वैद्यकीय क्षेत्रामधे पितृतुल्य व्यक्ती होते. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयविकार तज्ञ तसेच वैद्यकीय शिक्षणतज्ञ होते. वैद्यकीय क्षेत्रात, विशेषतः हृदयविकार क्षेत्रात अत्याधुनिक वैद्यकीय संशोधन आणि तंत्रज्ञान आणून त्यांनी आरोग्यसेवेत मोठे योगदान दिले. अनेक विषयांवर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांचे आयोजन करून वैद्यकीय ज्ञान प्रसारणासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
‘जागतिक हृदय दिन’ आयोजित करून तसेच ‘हार्ट टाक’ (हृदयस्थ) या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांमध्ये हृदयविकार तसेच त्याच्या प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती निर्माण केली. धन्वंतरी फाउंडेशन स्थापन करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या डॉक्टरांचा त्यांनी सन्मान केला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैद्यकीय सेवा क्षेत्राची हानी झाली आहे, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.