नागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर (रिच १ कॉरिडॉर) दरम्यान सीताबर्डी परिसरात भारतीय रेल्वेच्या रुळावरती तब्बल २१३ मीटर लांब कॅन्टिलिव्हर ब्रिज तयार करण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे कॅन्टिलिव्हर ब्रिज साकारतांना रेल्वेचे आवागमन कायम सुरु राहणार आहे. यासाठी विशेष खबरदारी महा मेट्रोतर्फे घेण्यात आली आहे.
कॅन्टिलिव्हर ब्रिज’चे बांधकाम करण्यासाठी पिलर उभारणीचे कार्य सुरु झाले आहे. ५६.२ मीटर, १०३ मीटर आणि ७२ मीटर अश्या तीन स्पॅन’चे कार्य याठिकाणी होणार आहे. २ पिलर दरम्यान रेल्वे रुळावरती १०३ मीटर’चा लांब स्पॅन राहील. भारतातील रेल्वे रुळावरील सर्वात मोठा कॅन्टिलिव्हर ब्रिज ठरणार आहे.
जमिनीवरून कोणताही आधार न घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने कॅन्टिलिव्हर ब्रिज’चे करण्यात येते. पिलरच्या वरती मास हेड तयार करून त्यावर स्टील यंत्राच्या साह्याने टप्य्या टप्प्यात ३-३ मीटर’चे सेगमेंट जुळवून कॅन्टिलिव्हर ब्रिज तयार होतो. या आधुनिक पद्धतीमुळे याला कॅन्टिलिव्हर ब्रिज असे म्हटल्या जाते.
सिनेमा हॉल, हॉटेल्स, व्यावसायिक प्रतिष्ठाने, बाजार, शाळा, निवासी संकुले असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. खरं तर हे संपूर्ण शहरातील सर्वात व्यस्त ठिकाणांपैकी एक आहे. यामुळे याठिकाणी रहदारी क्षेत्र आणि रेल्वेचे सतत आवागमन असल्याने तब्बल १६ मीटर उंचीवर कॅन्टिलिव्हर ब्रिज साकारतांना अनेक आव्हानांना समोर जावे लागणार आहे. यासाठी महा मेट्रोचे अधिकारी, अभियंता व सुरक्षा चमू पूर्णपणे तयार आहे. रेल्वे विभागाशी संवाद साधत सर्वोच सुरक्षा नियमांचे पालन बांधकामादरम्यान करण्यात येणार आहे.
अगदी सुरवाती पासून नागपूर मेट्रो प्रकल्पात नाविन्यपूर्ण संकल्पनेला प्राधान्य देण्यात आले आहे. दुसऱ्या सर्वात मोठ्या कॅन्टीलिव्हर ब्रिज’चे निर्माण होणार असून हे महा मेट्रोच्या इतिहासातील आणखी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. शहराच्या आधुनिक विकासात कॅन्टीलिव्हर ब्रिज आकर्षण ठरेल.