छप्पनभोग अन्नकूट कार्यक्रम संपन्न गीताबाई शर्मातर्फे मंदिराला 1 लाख देणगी
नागपूर: श्री महालक्ष्मी जगदंबा देवी मंदिर कोराडी येथे आज कार्तिक महिन्यातील छप्पनभोग अन्नकूट कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
यादरम्यान नागपूरच्या गीताबाई बन्सीलाल शर्मा यांच्याकडून मंदिराला 1 लाख रुपये देणगी देण्यात आली. देणगीच्या रकमेचा धनादेश पालकमंत्री बावनकुळे यांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर त्यांनी तो धनादेश मंदिराच्या व्यवस्थापनकडे सुपूर्द केला.
या महापूजेला ज्योतीताई बावनकुळे, संकेत बावनकुळे, मंदिराचे अध्यक्ष अॅड. मुकेश शर्मा, सचिव केशवराव फुलझेले, विश्वस्त दयाराम तडसकर, प्रेमलाल पटेल, अजय विजयवर्गी, नंदू बजाज उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते महापूजा आणि आरती यावेळी करण्यात आली.
कार्तिक महिन्यात देवीला 56 प्रकारच्या पक्वान्नांचा नैवेद्य देण्यात येतो. त्यालाच छप्पनभोग अन्नकूट म्हणतात. दरवर्षी याच महिन्यात हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. आज सुमारे 3-4 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.