मातीच्या माठाचे मुकुट असलेल्या महालक्ष्मींना विशेष महत्व
नागपूर : गणेशोत्सवाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य पसरलेला असताना विदर्भात अवर्णनीय असलेल्या महालक्ष्मींची प्रतिष्ठापना झाली आहे. घरात आनंद आणि चैतन्य पसरविणा-या अशाच या पवित्र महालक्ष्मींची शंभर वर्षांची परंपरा शहरातील हस्तक कुटुंबाने जपली आहे. शंभर वर्ष जुन्या व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेल्या या महालक्ष्मींच्या परंपरेमध्ये तब्बल तीस वर्ष खंड पडला. घरातील स्मिता हस्तक यांना मिळालेल्या संकेताने ती परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरापासून दूर चंद्रपुर जिल्ह्यातील गावातील घरातील छोट्याशा मंदिरात असलेल्या या महालक्ष्म्या अखेर नागपुरातील ‘स्वानंद’ या घरी आणण्यात आल्या आणि ‘स्वानंदा’तील प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद खुलला.
शहरातील वेस्ट हायकोर्ट मार्गावरील ‘स्वानंद’ हा निवासस्थानी वास्तव्यास असलेल्या हस्तक कुटुंबामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणा-या महालक्ष्मी भक्तीपूर्ण कुतुहल ठरत आहेत. भारतीय नौदलातील निवृत्त कमांडर कॅप्टन मिलिंद हस्तक व त्यांच्या सहचारीणी स्मिता हस्तक यांच्या पुढाकाराने २००९ पासून शंभर वर्ष जुन्या मातीच्या माठाच्या महालक्ष्मीची स्थापना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, घरामध्ये कधीकाळी महालक्ष्मींची प्रतिष्ठापना व्हायची याची कल्पनाही नसताना स्मिती हस्तक यांना स्वप्नात मिळालेल्या संकेतावरून आपल्या घरच्या महालक्ष्मींची माहिती मिळाली व शहरापासून शंभर ते दीडशे किमी अंतरावरील गावातून या महालक्ष्मींना भक्तीभावाने घरी आणून त्यांची आराधना सुरू झाली.
नागपुरातील हस्तक कुटुंब मुळचे चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा या गावचे. गावातील वाड्यात सुमारे १९०१ पासून महालक्ष्म्यांची प्रतिष्ठापना केली जायची. विशेष म्हणजे, या महालक्ष्मी संपूर्ण मातीच्या माठाच्या असायच्या. साडेतीन फुट उंच माठाच्या महालक्ष्मींचे मुकुटही मातीच्या माठाचेच होते. मनोरमा व मुकुंदराव हस्तक या दाम्पत्याने सुध्दा पिढीजात चालत आलेली परंपरा सुरू ठेवली. भारतीय नौदलातील निवृत्त कमांडर कॅप्टन मिलिंद हस्तक याच परिवारातले. मनोरमा व मुकुंदराव हस्तक हे रहाटे कॉलनी येथील सद्याच्या रहिवासी मीना उधोजी यांचे वडील. मुकुंदराव हस्तक यांच्या मृत्यूनंतर मात्र या परंपरेत खंड पडली.
शुभ संकेताने खंड पडलेली परंपरा सुरू
तब्बल तीस वर्ष खंडीत राहिलेली परंपरा स्मिता हस्तक यांना मिळालेल्या शुभ संकेतामुळे सुरू होउ शकली. लग्नानंतर नातेवाईकांकडे महालक्ष्मीची तयारी करायला जाणा-या स्मिता यांना एकदा स्वप्नामध्ये महालक्ष्मींनी आपल्या अस्तित्वाचे संकेत दिले. घरी कधीकाळी महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व्हायची याची कल्पनाही नसताना मिळालेले हे संकेत स्वस्थ बसू देत नव्हते. अशात कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केल्यानंतर चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथील घरी पिढीजात ऐतिहासीक माठाच्या महालक्ष्मी असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर धाबा येथील जुन्या घरामधील छोट्या मंदिरात या महालक्ष्मी मिळाल्या. अनेक वर्ष जुन्या आणि मातीच्या माठाच्या मुकुट असलेल्या महालक्ष्मी अगदी त्याच रुपात कोणत्याही प्रकारचा रंगही न उडता आताच सजवलेल्या असाव्यात अशा रुपात पाहून त्यावेळी सारेच अवाक झाले. त्यानंतर महालक्ष्मींचे पूजन करून २००९ ला नागपुरातील ‘स्वानंद’ येथे महालक्ष्मी आणण्यात आल्या. ‘स्वानंद’वर महालक्ष्र्मी आणताच काही दिवसातच धाबा येथील घरातील ज्या मंदिरात महालक्ष्मी ठेवल्या होत्या ते मंदिर पडले. त्यामुळे महालक्ष्मींनी आपणास बाहेर काढण्याचा संकेत योग्य होता अशी हस्तक कुटुंबाची खात्री पटली. यानंतर स्मिता हस्तक यांनी पुढील पाच वर्ष महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्याच निर्णय घेतला. पिढीजात पुरातन महालक्ष्मीच्या प्रतिष्ठापनेमुळे कुटुंबातील सर्व नातेवाईक एकत्र येउ लागले. लहान थोरांना भेटण्याचे एक नवे निमित्त मिळाले. हा आनंद पुढे असाच कायम राहावा यासाठी ही परंपरा आता खंड पडू द्यायची नाही असा निर्णय घेत ३० वर्ष खंड पडल्यानंतर आज २००९ पासून सलग १० वर्ष शंभर वर्ष जुन्या महालक्ष्मींची हस्तक कुटुंबियांतर्फे प्रतिष्ठापना करण्यात येत आहे.
आजही या महालक्ष्मींचे मुकुट मातीचेच आहे. त्यावेळी संपूर्ण माठाच्याच महालक्ष्मी साडेतीन फुट उंच असायच्या. त्याची प्रचिती म्हणून आता महालक्ष्मींच्या दोन्ही बाजूला माठ ठेवण्यात येतात, हे ही विशेष.
या महालक्ष्मीच्या आगमनाच्या निमित्ताने माहेरच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. बालपणातील महालक्ष्मी अगदी अजूनही तशाच आहेत. हे आई-बाबांनी आमच्या अनेक पिढ्यांसाठी दिलेली मोठी देण आहे, अशा शब्दांमध्ये मीना उधोजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.