नागपूर : महामेट्रो नागपूरने प्रवासी भाड्यामध्ये बदल करत नवीन दर जाहीर केले आहेत. मेट्रोने सध्याच्या भाड्याच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी दर कमी केले आहे. या अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगरपर्यंत आता ३० रुपयांऐवजी २५ रुपये आणि विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलतीसह १८ रुपये द्यावे लागतील.
तिकिट शुल्कात सवलत देऊन प्रवाशी संख्या वाढविण्याचा मेट्रोचा उद्देश आहे. मेट्रोने विकेंड सवलत ३० टक्के, राजपत्रित सुट्टी ३० टक्के, डेली पास १०० रुपये या उपाययोजना केल्या आहेत. मेट्रोच्या ४०.०२ किमीच्या प्रवासात ३६ स्टेशन येतात, हे विशेष.
महामेट्रो प्रवाशांकरिता ‘कॅश बॅक’ ची संकल्पना –
महामेट्रो प्रवाशांकरिता ‘कॅश बॅक’ ची संकल्पना लवकरच लागू होणार आहे. या सेवेंतर्गत एका महिन्यात महाकार्ड वापरणाऱ्या प्रवाशाला मेट्रोने प्रवास करत तिकीट दराच्या माध्यमातून एकूण ८०० रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास त्याला कॅश बॅकच्या माध्यमातून १० टक्के पॉईंट मिळेल.