मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) आज सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House) बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिवाळी अधिवेशन हे परंपरेनुसार नागपूरला होतं. पण गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे हे अधिवेशन मुंबईतच झालं होतं. त्यानंतर यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती तसेच विधान परिषदेची निवडणूक यामुळे यावर्षी देखील हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत भरवलं जाणार असल्याची चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी ठरण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 22 ते 28 डिसेंबरला मुंबईत करण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे. सोमवारी (29 डिसेंबर) संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे. त्यात या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.