बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील घरासमोर गुरुवारी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यात माजी उपमुख्यमंत्री व पवारांचे पुतणे अजित पवार हेही सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना मात्र आंदोलकांनी पिटाळून लावले.
शरद पवार यांनी मराठा आरक्षणाविषय़ी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या ‘गोविंद बाग’ या निवासस्थानासमोर सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत ठिय्या दिला. त्या वेळी अजित पवार तिथे आले आणि त्यांनीही शरद पवारांच्या घरासमोर ठिय्या दिला. शिवाय, स्वत: हातात माइक घेऊन आंदोलनाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या.
सरकारने साडेतीन वर्षे खेळवत ठेवले : पवार
सरकारने साडेतीन वर्षे आरक्षणाच्या प्रश्नावर केवळ खेळवत ठेवले. आरक्षणाच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्यास अधिवेशनात आंदोलकांची बाजू कोण मांडणार? हा मुद्दा विधानसभेत गाजवण्यासाठी मी राजीनामा देत नाही, असे अजित पवार म्हणाले.