मुंबई : राज्यात कालपासून पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये सरकारचा २०२४-२५ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.
अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार राज्यातील २१ ते ६० वयोगटामधील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.
या योजनेसंदर्भात बोलतांना अजित पवार म्हणाले की, आमच्या लेकी बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे.
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, आरोग्य आणि पोषणासह सर्वांगिण विकासासाठी या योजनेंतर्गत २१ ते ६० वयोगटामधील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये प्रदान केले जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे अजित पवार म्हणाले.