ठाणे : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले. यापार्श्वभूमीवर या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी आमंत्रित केले.या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला येण्याचे मान्य केले. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळा पाहणे ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट असल्याने अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले असून अयोध्येला येण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.