मुंबई: राज्यात गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने पहिल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८’ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात येणार असून एमएमआरडीए ग्राऊण्ड येथे १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स 2018’ या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अत्याधुनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी तसेच, मेक इन इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्याने औद्योगिक क्षेत्रात गेल्या तीन वर्षात पुन्हा अग्रस्थान मिळविले आहे. देशाच्या एकुण परकीय गुंतवणूकीपैकी सुमारे पन्नास टक्के परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रात होते. पायाभूत सुविधा, निर्यात आणि वित्त क्षेत्रातही राज्य कायम आघाडीवर आहे. येत्या दहा वर्षात राज्यात ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था तयार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सर्व विभागाच्या तुलनेत उद्योग विभागाची प्रगती २० टक्क्यांनी अधिक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात सन २०१६ ला ‘मेक इन महाराष्ट्र’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा परिणाम अत्यंत सकारात्मक झालेला आहे. या परिषदेत सुमारे २० हजार ९८४ सामंजस्य करार करण्यात आले होते. यातील ५१ टक्के प्रकल्प हे प्रत्यक्ष कार्यरत झाले आहेत, प्रस्तावित गुंतवणूकीच्या ६१ टक्के प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे तर यातून अपेक्षित असलेल्या २२ लाख रोजगार निर्मिती पैकी सुमारे ७४ टक्के रोजगार निर्माण झाले आहेत.
यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नजिकच्या काळात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, नव्या योजनांमुळे राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. राज्याने जाहिर केलेले महिला उद्योग धोरण हे राष्ट्रीय स्तरावरील पहिलेच जाहीर धोरण असल्याचेही ते म्हणाले. औद्योगिक नाविन्यता आणि स्मार्ट उत्पादकतेमध्ये जगभरात सातत्याने अव्वल स्थानी असणारे एक फ्युचर रेडी म्हणजेच भविष्यासाठी सज्ज असलेले राज्य उभारण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या परिषदेची माहिती देताना एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी भविष्यातील औद्योगिक वृद्धीमध्ये राज्याचे असलेले योगदान व त्यादृष्टीने राज्याची असलेली तयारी यावर लक्ष वेधून घेतले. ही तीन दिवसीय परिषद जागतिक गुंतवणूक परिषद रोजगार, शाश्वतता, पायाभूत सोयीसुविधा आणि भविष्यकालीन उद्योग या चार मुख्य स्तंभावर आधारलेली आहे. या पहिल्या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून, भारतातील सर्व औद्योगिक गुंतवणूकीचे प्रवेशद्वार म्हणून असलेली महाराष्ट्राची ओळख ही आणखी भक्कम करण्याचा आमचा हेतू आहे,असे त्यांनी सांगितले.
यावेळी मोहिमेच्या ‘#MadeForBusiness’ या टॅगलाईनचे अनावरण तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स 2018 हे स्मार्टफोन अप्लिकेशन आणि या परिषदेविषयीची सर्व माहिती पुरवणाऱ्या www.midcindia.org/convergence2018/registration या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले.
राज्यातल्या नवोदित व तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ३०’ या स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे पहिले बक्षिस ५० लाख रुपये, दुसरे ३० लाख रुपये आणि तिसरे २० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी मंचावर उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी उपस्थित होते.