Published On : Thu, Dec 21st, 2017

“महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप” मुळे राज्याची पारदर्शितेकडे वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement


नागपूर: ‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप’ मुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम तर पोलीस प्रशासन नागरिकांप्रती उत्तरदायी झाले आहे. ॲपच्या माध्यमातून नागरिकांना गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड ऑनलाईन पाहणे, ऑनलाईन तक्रार दाखल करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहे. ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्राने पारदर्शितेकडे भक्कम पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

चिटणवीस सेंटर येथे आयोजित महाराष्ट्रातील गुन्हेगारी- 2016 या पुस्तकाचे विमोचन आणि महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲपचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल, पोलीस आयुक्त के. व्येंकटेशम आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल ॲप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच्या अथक प्रयत्नांनी हे ॲप विकसित करण्यासाठी यश मिळाले आहे. आता नागरिकांना ऑनलाईन तक्रार केल्यानंतर त्याचा ईलेक्ट्रानिक पुरावा त्यांच्याकडे राहणार आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही अशी सबब सांगता येणार नाही. वेगवेगळया तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पोलीस विभागाला पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचा उपयोग लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी होणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन केले.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सीसीटीएनएस प्रणाली राबणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. यामुळे गुन्ह्याचा तपास, पुरावे शोधणे व गोळा करणे, माहिती गोळा करणे व साठवणे सहज शक्य होणार आहे. गुन्हा सिध्दतेचा दर राज्यात वाढला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपीला शिक्षा झाली नाही तर कायद्याचा धाक गुन्हेगारांवर राहत नाही. गुन्हा सिध्दतेसाठी पोलिसांनी वेगवेगळया उपाययोजना केल्यामुळे हा दर वाढला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील गुन्हेगारी 2016 या पुस्तकाचे विमोचन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात राज्यातील गुन्ह्यांची वस्तुनिष्ठ सांख्यिकी माहिती, विवेचन, गुन्हेगारीच्या प्रवाहाचे शास्त्रोक्त विश्लेषण तसेच गुन्ह्यांचे नवीन स्वरुप आणि गुन्ह्यांमधील चढ-उतार इत्यादीचे माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारी -2016 अहवालामध्ये एकूण 23 प्रकरणे असून त्यामध्ये महत्वाचे प्रकरणे गुन्हे सर्वेक्षण, मोठया शहरातील गुन्हेगारी, स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे, बालकांवरील अत्याचार, आर्थिक गुन्हे, जेष्ठ नागरिकांवरील गुन्हे, बालगुन्हेगारी असे महत्वाच्या प्रकरणांचा समावेश आहे.

यावेळी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांनी मोबाईल ॲपबाबत सादरीकरण केले.



असे आहे ॲप –

महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे राज्यातील सर्व नागरिकांसाठी Maharashtra Police Citizen Portal (www.mhpolice.maharashtra.gov.in) यावर विविध 24 सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यापैकी निवडक सेवा Maharashtra Police Citizen Portal App च्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर ॲप गुगल प्ले स्टोअर तसेच ॲप स्टोअर मधून डाऊनलोड करु शकता. या मोबाईल ॲपमध्ये नोंदणी करुन नागरिक ई-तक्रार देणे, पोलीस स्टेशनला माहिती देणे, प्रकाशित प्रथम खबर पाहणे, तक्रारीची सद्यस्थिती पाहणे, अटक आरोपीची माहिती पाहणे, अनोळखी मृतदेहाची माहिती पाहणे, हरवलेल्या इसमाची माहिती पाहणे व इतर तीन सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

ई-तक्रार केल्यानंतर तक्रारदारास त्याचा एसएमएस व ई मेल प्राप्त होतो. त्यामध्ये तक्रारींचा क्रमांक व तक्रार कोणत्या पोलीस ठाण्यात देण्यात आली, याची माहिती देण्यात येते. तक्रारीच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी नेमल्यानंतर, तक्रारीची निर्गती केल्यानंतर तक्रारीवर काय कार्यवाही झाली, याची माहितीसुध्दा एसएमएसव्दारे तक्रारदारास देण्यात येते.

Advertisement