वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपुरात बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. आता विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये वीजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळं आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, आधीपासूनच अवकाळीनं राज्याची चिंता वाढवली आहे. अशातच पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंघावत असल्यामुळं बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. आधीपासूनच बदलतं हवामान आणि अवकाळी, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं ठाकलं आहे.
मंगळवारी देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी दिवसभर उष्ण वातावरण दिसून आले, मात्र मध्यरात्री दिल्लीसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. कालच हवामान विभागाने दिल्ली आणि आसपासच्या परिसरात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्र वगळत अन्य ठिकाणी गारठा कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.