नागपूर : महाराष्ट्र राज्य विदेशी गुंतवणूक ( FDI )आणण्यात देशात पुन्हा एकदा ठरले नंबर 1 ठरल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. गेल्या 3 महिन्यात राज्यात 28 हजार 868 कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली.
FDI मध्ये महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकालाही मागे टाकल्याचे ते म्हणाले.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, सत्ताधारी विरोधकांमध्ये वादंग पेटले आहे. यातच ठाकरे गटाचे आमदार तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मागील दीड वर्षांत किती उद्योग महाराष्ट्रात आणले असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांना केला होता. त्याला उत्तर म्हणून उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत आकडेवारी जाहीर केली.
2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत FDI मध्ये देशात महाराष्ट्र पुन्हा नंबर वन आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT), भारत सरकारने जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) अहवाल जारी केला आहे. या तिमाहीत महाराष्ट्राने 28,868 कोटी विदेशी गुंतवणुकीमध्ये आघाडी घेतली आहे. त्यानंतर 12,891 कोटी रुपयांसह गुजरात दुसऱ्या स्थानावर आणि 11,414 कोटी रुपयांसह कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.
ही आकडेवारी त्यांनी पोस्टमधून जाहीर केली आहे. पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राज्यात महायुती सरकारची यशस्वी घौडदौड सुरू आहे. गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मनापासून अभिनंदन! असेही सामंत म्हणाले.