मुंबई : मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) होणार आहे. नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विधान परिषदेच्या या जागांसाठी पसंतीक्रमाने मतदान करण्यात येते. त्यामुळे दुपारनंतरच अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपाने स्वबळावर निवडणुका लढविल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे.
या मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून भारत निवडणूक आयोगाने तसेच महसूल यंत्रणेने प्राधिकृत केलेल्या व्यक्तींनाच फक्त या इमारतीत प्रवेश असणार आहे. सांस्कृतिक भवनाच्या पहिल्या मजल्यावर मुंबई शिक्षक तर दुसऱ्या मजल्यावर कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधरची मतमोजणी होणार आहे. तुलनेने कोकण पदवीधरमधील मतदारांची संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी मतमोजणी सुव्यवस्थित व वेगाने होण्यासाठी २८ टेबल्स मांडण्यात आले आहेत. याशिवाय या वेळेस काही सूक्ष्म निरीक्षकदेखील मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहेत.
पसंतीक्रम पद्धतीचे मतदान असल्याने उमेदवाराला विजयी होण्यासाठी विशिष्ट फॉर्म्युलाद्वारे आवश्यक कोटा निश्चित करण्यात येतो त्यानुसार सर्व उमेदवारांना मिळालेली मते मोजली जातात. मुंबई शिक्षक मतदारसंघात ८ हजार ३५३ मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ८२.१३ आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ३७ हजार २३७ मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ५२.८१ तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण ७५ हजार ४३९ मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ७२.३५ आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात ४९ हजार ७४२ एवढे मतदान झाले असून, त्याची ९२.३० टक्केवारी आहे.
शाळांनी शिक्षकांकडे
‘त्या’ रजेचे अर्ज मागू नये!
मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांना मतदान करता यावे, यासाठी शाळांना विशेष सुट्टी देण्यात आली होती. मात्र शाळांमधून शिक्षकांकडे रजेचा अर्ज मागितला जात असल्याच्या तक्रारी शिक्षक परिषदेकडे आल्या आहेत. म्हणून २५ जून रोजीची ‘विशेष सुट्टी’ असल्याने शिक्षकांची रजा कापण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे बुधवारी केली आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाºयांच्या पत्राच्या संदर्भानुसार मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागातील सर्व शाळांना मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुट्टी दिली होती. शिक्षक मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी २२ जून रोजी तसे आदेशही काढण्यात आले. म्हणूनच भर पावसातही शिक्षक मोठ्या संख्येने मतदान करू शकले.
मुंबईतील अनेक शिक्षक मुंबईत राहत नसल्याने ते मुंबईत मतदान करू शकले नाहीत. पण कोकण पदवीधर मतदारसंघात त्यांनी ठाणे, नवी मुंबई व पालघर जिल्ह्यात मतदान केले. तरीदेखील मुंबईत दुसºया दिवशी शाळा प्रशासनाने सीएल (किरकोळ रजा)चा अर्ज मागितल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेत अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे शिक्षकांना शाळांनी अशा रजेच्या अर्जाची मागणी न करण्याचे पत्र देऊन संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे.