मुंबई : राज्यात उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होत चालल्या असून, हवामान विभागाने पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील काही भागांना उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भ आणि कोकण विभागात तापमान झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची तारांबळ उडणार आहे.
नागपूरसह विदर्भात चाळीशी पार, कोकणात यलो अलर्ट-
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे, परिणामी तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. अकोला, नागपूर, यवतमाळ, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या भागांत पारा चाळीशी पार गेला आहे. हवामान विभागाच्या मते पुढील २-३ दिवसांत तापमानात आणखी २-३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.
कोकणात दमट हवामानामुळे यलो अलर्ट जारी-
कोकण भागात सध्या दमट हवामानामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. जळगाव, नाशिक, सोलापूर या भागांनाही उन्हाचा तडाखा बसत आहे.
दक्षिण भारतात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव-
कर्नाटकच्या अंतर्गत भागांवर सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवतो आहे, तर मराठवाडा व तामिळनाडूच्या दक्षिणेकडील भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळं राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं असलं तरी, तापमानात वाढ झाल्याने उकाडा अधिक तीव्र झाला आहे.
१० एप्रिलनंतर पुन्हा अवकाळीचा इशारा-
हवामान विभागानुसार १० एप्रिलनंतर राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट घोंगावण्याची शक्यता आहे. यावेळी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा इशारा-
दक्षिण भारतातील बदलत्या हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रातील वातावरणातही सतत बदल होतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलांचा वेळीच अंदाज घेऊन योग्य नियोजन करणं अत्यावश्यक आहे.
नागरिकांना सूचना-
-गरजे शिवाय उन्हात बाहेर जाणं टाळा
-भरपूर पाणी प्या व हलकं आहार घ्या
– थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करा
-लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी