
Representational pic
वर्धा: बनावट फेसबुक अकाउंट तयार करून बदनामीकारक मजकूर टाकून बदनामी केल्याप्रकीणी एका महिलेने वर्धा जिल्ह्यातील सिंदी पोलिस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१७ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये मुंबई पुणे, गोवा, लातूर, बिड, नांदेड, नागपूर, गडचिरोली व वर्धा येथील अनेक महिलांचे छायाचित्र आढळून आले असून तो बऱ्याच महिलांसोबत फेसबुक, व्हाट्सअॅपवर अश्लिल चॅटींग करीत असल्याची बाब समोर आली आहे.
मच्छींद्र बळीराम कावडे (३७) रा. ईश्वर नगर नांदेड असे आरोपीचे नाव आहे. सिंदी पोलिस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१७ रोजी एका महिलेने फेसबुकवर बनावट फेसबुक अकांउंटद्वारे बनामीकारक मजकूर टाकल्याची तक्रार दाखल केली. सिंदी रेल्वे पोलिस आणि सायबर पोलिस वर्धा यांनी तत्काळ तपास करून बदनामीकारक फेसबुक अकाउंट बंद केले. यानंतर आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. गुन्हा दाखल केलेल्या तारखेनंतर सुध्दा सदर आरोपी वेळोवेळी फिर्यादी महिला व स्वतःचे खोटे अकाउंट तयार करून बदनामी करण्याचे काम सुरूच ठेवले होते. आरोपी फेसबुक सोबतच व्हाॅट्सअॅपद्वारे सुध्दा त्रास देत होता.
या प्रकरणी फेसबुक, व्हाॅट्सअॅप व मोबाईल कंपन्यांकडून माहिती काढून तपास सुरू केला. यादरम्यान आरोपी हा नांदेड येथे वास्तव्यास असल्याबाबत इत्यंभूत माहिती काढण्यासाठी पोलिस पथक नांदेड येथे रवाना करण्यात आले. संपूर्ण तांत्रिक पध्दतीने असलेल्या या गुन्ह्याचा तपास सायबर सेल तर्फे करून आरोनी मच्छींद्र कावडे याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्याला वर्धा येथे आणण्यात आले.
आरोपीची अधिक विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मधील माहितीवरून सदर आरोपी हा फेसबुक, व्हाॅट्सअॅपवरून महिलांचे फोटो व त्यांची इतर माहिती घेत होता. तसेच त्यांच्याशी संपर्क साधून चॅटींग करून त्यांची व त्यांच्या परिवाराबाबत, मित्रपरिवाराबाबत माहिती घेवून त्यांनासुध्दा संपर्क करायचा. तसेच बदनामी करणारे संदेश, अश्लिल फोटो, व्हीडीओ व्हाॅट्सअॅपद्वारे पाठवायचा. तक्रारकर्त्या महिलेच्या फेसबुक अकांउंटवरून त्याने फोटो मिळवून तिचे खोटे अकाउंट तयार केले. यानंतर सबंधित व्यक्तींना त्रास देणे सुरू केले.
आरोपीच्या मोबाईलमध्ये तपासी अधिकाऱ्यांना मुंबई, पुणे, गोवा, लातूर, बिड, नांदेड, नागपूर, गडचिरोली व वर्धा येथील अनेक महिलांचे फोटो सापडले आहेत. यापैकी अनेक महिलांसोबत आरोपी अश्लिल चॅटींग करीत असल्याचे आढळून आले आहे. सबंधित महिलांशी पोलिसांमार्फत संपर्क साधला जात असून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस ठाणे सिंदी रेल्वे मार्फत करण्यात येत आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पराग पोटे, पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक फौजदार संजय देवरकर, पोलिस हवालदार जयदेव धामीया, चंद्रभान मेघरे, कुलदिप टांकसाळे, निलेश कट्टोजवार, अनुप कावळे, दिनेश बोथकर, अक्षय राउत, गजानन मस्के, अभिजीत वाघमारे यांनी केली आहे.
सोशल मिडीयाचा वापर करताना प्रत्येकांनी सोशल साईट्सकडून देण्यात येत असलेल्या सेटींगचा वापर करून अनोळखी व्यक्तीपासून संरक्षण मिळविणे गरजेचे आहे. अनेकांना सोशल साईट्समुळे त्रास सहन करावा लागतो. विशेषतः महिलांनी आपले छायाचित्र सोशल साईट्सवर अपलोड करणे टाळणे गरजेचे आहे.