Published On : Wed, Feb 7th, 2018

आर्थिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्राची धोरणे उद्योगपूरक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रातील विविध प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी उद्योगपूरक अनेक धोरणे तयार केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वर्षा निवासस्थानी आज जागतिक पातळीवर गुंतवणूक करणाऱ्या गोल्डमन सॅक ॲसेट मॅनेजमेंटच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. दळणवळणाच्या सोयी, चांगले रस्ते, चोवीस तास वीज आणि पाणी, भरपूर जमीन उपलब्ध आहे. राज्यात अनेक जलसिंचनाचे प्रकल्प सुरु आहेत. कृषिविषयक उत्पादने, अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या संधी आहेत. मुंबई आणि नागपूरमध्ये मेट्रोचे काम सुरु आहे. मुंबईत रेल्वेचे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, सागरी महामार्गाची कामे सुरु होणार आहेत.

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उद्योगांना चालना मिळावी म्हणून अलीकडेच शासनाने लॉजिस्टिक पार्क, फिन्टेक, पर्यटन, आयटी, टेक्सटाईल, डिफेन्स, इलेक्ट्रिक व्हेईकल अशी अनेक उद्योगांना पूरक, गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणारी धोरणे (Policy’s) तयार केली आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार नक्कीच महाराष्ट्राकडे आकर्षित होतील. येत्या 18 ते 23 फेब्रुवारी दरम्यान जागतिक गुंतवणूकदारांची शिखर परिषद मुंबईत होत आहे. या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेवटी केले.

प्रारंभी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी सादरीकरणातून राज्यात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. त्यानंतर शिष्टमंडळातील सदस्यांनी महाराष्ट्राचे उत्पन्नाचे स्त्रोत, जीएसटी, व्हॅट, टॅक्स आकारणी, मुंबईतील सांडपाणी व्यवस्था, भू संपादन प्रक्रिया, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, प्रधानमंत्री आवास योजना, राज्याचा जीडीपी आदींसंदर्भात प्रश्न विचारुन मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. अमेरिकेच्या लिसा रिटेनबर्ग यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांच्या माहितीमुळे संपूर्ण शिष्टमंडळ प्रभावित झाल्याचे सांगून शेवटी आभार मानले.

या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के.जैन, उर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार तसेच गोल्डमॅन सॅक ॲसेट मॅनेजमेंटचे अमेरिकन प्रतिनिधी सर्वश्री कॅथेराईन कोच, रॉबर्ट पॅच, रॅफेल डीफेक्स, ज्यूक बार्स, विल्यम ली, हिरेन डासानी आदी उपस्थित होते.

Advertisement