मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून भाजपाला कोंडीत पकडण्याची तयारी करीत आहेत. यातच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळविणे तिन्ही पक्षाचा आत्मविश्वास वाढला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षातील नेतेमंडळी उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात असा निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. ठाकरे गट १६, राष्ट्रवादी १६ आणि काँग्रेस १६ जागा लढवेल, असा तर्क लावण्यात येत आहे.
लोकसभेला महाविकास आघाडीचा १६-१६-१६ चा फॉर्म्युला ठरला का ? असा प्रश्न नाना पटोले यांना प्रसार माध्यमांनी विचारला. यावर पटोले म्हणाले, याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. प्राथमिक चर्चा झाली आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर कोणतीच चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.