नागपूर : काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेता जाहीर केला आहे. विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे काँग्रेसचं प्रदेशाध्यपद विदर्भात असताना, विरोधी पक्षनेतेपदही विदर्भातच देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला. हा पदभार स्वीकारल्यानंतर वडेट्टीवार पहिल्यादांच नागपुरात आले. ते विमानतळावर पोहोचताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
महविकास आघाडीकडून आतापासूनच विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. हे पाहता विदर्भात विधानसभेच्या ६२ जागांपैकी ४५ जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तसेच फडणवीस यांना पुन्हा विरोधी पक्षात बसावे लागेल,असेही ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांकडून वारंवार जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. सत्ताधारी नेते जनतेचे नेते प्रश्न सोडवत नाही तर तेव्हा जनता विरोधी पक्षाकडे आशेने पाहते. पावसाळी अधिवेशनात आम्हाला जनतेचे प्रश्न पाहिजे तसे मांडता आले नाही. मात्र नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सरकारला आम्ही धारेवर धरणार,असे वडेट्टीवार म्हणाले.
भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षात फूट पाडली. मात्र काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असून कधीच फुटणार नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
काँग्रेसतर्फे नागपुरात ओबीसींची महारॅली आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. या रॅलीसाठी देशभरातील ‘इंडिया’ आघाडीच्या ओबीसी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच शिंदे सरकारसोबत गेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला. त्यामुळे ते शिंदे आणि फडणवीस सरकारची साथ सोडून महाविकास आघाडीशी पुन्हा हातमिळवणी करतील, अशी शक्यता असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.