मुंबई: वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली असून जास्तीत जास्त औद्योगिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे 97 हजार 464 औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. अशा ग्राहकांसाठी महावितरणने दि. 1 जून 2018 ते दि. 31 ऑगस्ट 2018 या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. ज्या वीजग्राहकांचा वीज पुरवठा दि. 31 डिसेंबर 2017 पूर्वी कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे, अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना 100 टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. दि. 1 जूलै 2018 ते दि. 31 ऑगस्ट 2018 या दरम्यान ग्राहकाने मूळ थकबाकीची रक्कम व व्याजाची 25 टक्के रक्कम भरली तर उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची माफी ग्राहकाला मिळणार आहे.
जे न्यायालयीन प्रकरण 12 वर्षापेक्षा अधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल तर संबंधित ग्राहकांनी डिक्रीची रक्कम एकाच वेळी पूर्ण भरल्यास त्या ग्राहकाला 100 टक्के व्याजाची माफी मिळणार आहे. तसेच जे न्यायालयीन प्रकरण 12 वर्षापर्यंतचे आहे व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली आहे, अशा ग्राहकांनी एका टप्प्यात डिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना 50 टक्के व्याजमाफीची सूट मिळणार आहे. यासर्व प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च संबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे.
ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख /नेट पेमेंट/चेक या माध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीज जोडणी देण्यात येईल. या अभय योजनेत ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्या रकमेची माहिती घ्यावयाची आहे अशा ग्राहकांनी महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in यावरील ‘AMENESTY SCHEME 2018 या लिंकवर जाऊन ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाकल्यास या योजनेची व ग्राहकाच्या थकबाकीची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. या योजनेत दि. 1 जून 2018 पासून ग्राहकांना सहभागी होता येईल. याबाबतचे परिपत्रक महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या जास्तीत जास्त औद्योगिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.