नागपूर: खासदार औद्योगिक महोत्सवाचा एक भाग म्हणून नागपुरात आयोजित तीन दिवसीय ‘अॅडव्हान्टेज विदर्भ 2025’ या प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणुकीशी संबंधित विषयांचा ऊहापोह करणाऱ्या या प्रदर्शनात महावितरणतर्फ़े लावण्यात आलेल्या दालनाला नागरिकांचा उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळाला. महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, ग्रामीण वीज महामंडळाचे कार्यकारी संचालक कुलदीप राय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे उपसचिव दिव्यांशु झा, ग्रामीण वीज महामंडळाच्या कार्यकारी संचालक सरस्वती मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) पंकज तगडपल्लीवार यांचेसह केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक वरिष्ठ अधिका-यांनी या दालनाला भेट देत उपस्थितांशी चर्चा केली
या प्रदर्शनात महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, मागेल त्याला सौर कृषीपंप, छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठीच्या प्रधानमंत्री सुर्यघर – मोफ़त वीज योजना बाबतची विस्तृत माहिती छापील आणि दृकश्राव्य माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली. नागरिकांनी महावितरणच्या या दालनाला उत्सफ़ुर्तपणे भेट देत विविध योजनांची माहिती घेत त्यांच्या शंकांचे निरसन करुन घेतले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि राजेश नाईक, कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, राजेश घाटोळे यांच्यासह कॉग्रेसनगर, महाल, सिव्हील लाईन्स आणि गांधीबाग विभागातील अभियंत्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून नागरिकांच्या विविध शंकांचे समाधान केले सोबतच महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केले.
राज्यातील ग्राहकांना आतापर्यंत 781 कोटी रुपयांचे अनुदान
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील वीज ग्राहकांना केंद्र सरकारकडून आतापर्यंत 781 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या योजनेत गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर असून, त्यांना 1,878 कोटी रुपयांहून अधिक अनुदान मिळाले आहे.
या महोत्सवा’त अक्षय ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानावरील एका चर्चासत्रात ग्रामीण वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही आकडेवारी जाहीर केली. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी ग्रामीण वीज महामंडळ ही राष्ट्रीय कार्यक्रम अंमलबजावणी संस्था आहे. या कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक वरिष्ठ अधिका-यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, अनेक प्रकल्पांमुळे देशातील सौर ऊर्जा उत्पादन 36 टक्क्यांवरून 47 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. “2070 पर्यंत भारताला शून्य कार्बन उत्सर्जन देश बनवण्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे.”
ग्रामीण वीज महामंडळाचे कार्यकारी संचालक कुलदीप राय म्हणाले, “आम्ही एका महिन्यात प्रधानमंत्री सूर्य घर पोर्टल 2.0 सुरू करणार आहोत. यामुळे सध्याच्या पोर्टलमध्ये येत असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण होईल.” तर, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे उपसचिव दिव्यांशु झा म्हणाले की, गेल्या वर्षी प्रधानमंत्री सूर्य घर मोफ़त वीज योजना सुरू झाल्यापासून रूफटॉप सौर पॅनेल बसवण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. योजनेच्या पहिल्या वर्षात अनेक बदल झाले आणि येत्या काही दिवसांत ही प्रणाली आणखी मजबूत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले
या सत्रात, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण झाले.
यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) पंकज तगाडपल्लीवार यांनी योजनेतील प्रमुख घटक, सहभाग, केंद्र शासनातर्फ़े दिले जाणारे अनुदान, त्यासाठीची पात्रता, अर्ज करण्यापासून ते अनुदान मिळण्यापर्यंत प्रक्रिया, या योजनेचे मोबाईल ऍप आणि संकेतस्थळ याबाबतची इत्यंभुत माहिती दिली.