मुंबई : लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे दोन टप्पे पार पडले तरी अद्याप महाराष्ट्रातील महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.
आज ठाणे, कल्याण आणि नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाने दोन तासांपूर्वी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील त्यांचे उमेदवार जाहीर केले.
पाठोपाठ आता नाशिकचा उमेदवारही जाहीर केला आहे. शिंदे गटाने कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तर ठाण्यातून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे महायुतीचे (शिंदे गट) लोकसभेचे उमेदवार आहेत.
तर शिंदे गटाने नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवले. नाशकात हेमंत गोडसे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे मैदानात उतरले. हेमंत गोडसे उद्या (२ मे) नाशकात शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरू शकतात. आज महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीमुळे अर्ज भरता येणार नाही.
दरम्यान नाशिकच्या जागेवर भाजपाकडून दावा सांगितला जात होता. छगन भुजबळही नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक होते. त्यांच्या नावाचीही बरीच चर्चा झाली. पण अखेर ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली.