मुंबई :महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नवीन नियमावली निश्चित करण्यात येणार आहे .
त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली आहे. त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.आज परिवहन विभागामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक बस मध्ये पॅनिक बटन ,आग प्रतिबंधक स्पिंकलर, GPS यंत्रणा, CCTV कॅमेरा आदी उपकरणे असणे आवश्यक आहे. तसेच ज्या संस्था अथवा स्कूल बस चालवणारे चालक पालकांच्याकडून विद्यार्थी वाहतुकीची शुल्क आकारतात, त्यांच्याकडे बसेस मधील सीसीटीव्ही कॅमेराचे एकात्मक नियंत्रण असणे आवश्यक आहे.
जेणेकरून बसमध्ये भविष्यात विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही अप्रिय दुर्घटना घडणार नाही. या सर्व सुचनांचा विचार करून पाटील समितीने आपला अहवाल सादर करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून या स्कूल बसेस साठी नवी नियमावली निश्चित करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली आहे.
या समितीने आपला अहवाल पुढील एक महिन्यांमध्ये सादर करावयाचा आहे . तसेच या संदर्भात सन २०११ मध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची मनमानी रोखण्यासाठी मदान समितीने ज्या उपायोजना सुचवल्या होत्या त्या देखील विचारात घेतल्या जाणार आहेत. या सर्वंकश अहवालाच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेस साठी नियमावली निश्चित केली जाणार आहे.