मुंबई: गोरेगाव परिसरातील एका इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली. येथील ओबेरॉय मॉलच्या परिसरात ही इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेट आहे. या औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामाला आज सकाळी अचानकपणे आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली. त्यामुळे थोड्याचवेळात आगीने भीषण स्वरुप धारण केले.
आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. सध्या आठ फायर इंजिन आणि सहा पाण्याचे बंब आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, आग मोठी असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या आगीत इंडस्ट्रीयल इस्टेटमधील दोन गोदामे जळून खाक झाली आहेत. मात्र, आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, हेदेखील अजूनपर्यंत कळू शकलेले नाही.