अहमदाबाद : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर चार महिने उलटले तरी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र थांबताना दिसत नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनात भाषण करताना भाजपवर मोठा आरोप केला आहे. त्यांनी महाराष्ट्र निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
महाराष्ट्रात अचानक 55 लाख नवमतदार कुठून आले? भाजपने 150 पैकी 138 जागांवर विजय मिळवला. 90 टक्के यशाचा असा इतिहास याआधी कधी पाहिला आहे का?असा सवाल करत खर्गे म्हणाले की, मी स्वतः 12-13 निवडणुका लढलोय, पण असं कधीच झालं नाही.
ईव्हीएमवरून सरकारवर हल्लाबोल खर्गे म्हणाले, भाजपने अशी टेक्नोलॉजी बनवली आहे जी त्यांना विजय मिळवून देते आणि विरोधकांचा पराभव करते. ही निवडणूक नव्हे, ही लोकशाहीची फसवणूक आहे.संपूर्ण जग पुन्हा बॅलेट पेपरकडे वळत आहे, मग भारतातच ईव्हीएमचा वापर का? ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपर वापरण्याची गरज आहे.
देश विकला जातो-मोदींवर थेट आरोप
फक्त निवडणुकीपुरतेच नव्हे, तर खर्गेंनी देशाच्या आर्थिक धोरणांवरही गंभीर टीका केली. आज देश एकाधिकारशाहीकडे जात आहे. सामान्य जनतेची संपत्ती मोदी सरकार त्यांच्या श्रीमंत मित्रांच्या हातात देत आहे. हे असंच चालले, तर एक दिवस मोदी देशच विकून टाकतील,असे ते म्हणाले.हा लढा केवळ राजकीय नाही, तर लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आहे. आपल्याला एकत्र येऊन या अन्यायाविरोधात लढावं लागेल.