नागपूर: संत्रा मार्केट व खोवा मार्केट येथील परावानेधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच निर्णय घेण्यात यावे, असे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.
मंगळवारी (ता.८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात संत्रा व खोवा मार्केट येथील परवानेधारकांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, अग्निशमन समिती सभापती लहुकमार बेहेते, नगरसेवक संजय बालपांडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, एनईएसएलचे संचालक डॉ. आर.झेड. सिद्दिकी, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, बाजार अधीक्षक मदन सुभेदार, गांधीबाग झोन सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक आयुक्त (जाहिरात व बाजार) विजय हुमने प्रामुख्याने उपस्थित होते.
संत्रा मार्केटमधील महानगरपालिकेच्या मालकीची काही जागा नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता देण्यात येत आहे. तेथील परवानेधारकांना पर्यायी जागा देण्यात येत आहे. त्यासाठी असोशिएशनमार्फत आलेली पत्रे आणि परवानेधारकांची सूची तपासून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश प्रकल्प समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिले. ही कार्यवाही करीत असताना कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, अशीही सूचना प्रवीण दटके यांनी केली.