नागपूर: जिल्हयात झालेल्या संततधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली असुन काल 25 गावाला पूराचा विळखा पडला होता. आज सकाळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांच्यासह पुरग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणी दरम्यान तालुक्यात पुराने जनजीवन विस्कळीत झाले असून पिकांची मोठी हानी झाल्याचे दिसून आले. पुरग्रस्त कुटुंबाच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
खापरखेडा तालुक्यातील बीणानदीमुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे, पारशिवणी तालुक्यातील सिंगारदीप या नदीतील पुराच्या पाण्यामुळे शेतातील पिकांची हानी झालेली आहे तसेच मौदा तालुक्यातील कन्हान नदीला आलेल्या पुरात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मौदा तालुक्यातील 18 गावे पुरामुळे बाधित झाले असून 1158 कुटुंबांना याचा फटका बसला आहे. साधारणत 6186 हेक्टर अंदाजे शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मौदा तहसिलदार प्रशांत सांगाडे यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली.
पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुरग्रस्त भागातील गावकऱ्यांची विचारणा करून त्यांच्या अडचणीबाबत चर्चा केली. पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती, घरे व संसारपयोगी वस्तू यांचे तातडीने पंचनामे करुन प्रशासनातर्फै सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.