नागपूर: नागपूर महानगरपालिका ही शहराची पालकसंस्था आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये सर्वात लोकाभिमुख यंत्रणा ही महानगरपालिका आहे. शहरातील जनतेला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सेवा पुरविणारी नागपूर महानगरपालिका ७५व्या वर्षात पदार्पण करुन एक महत्वाचा पल्ला गाठत आहे. दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या नागपूर महानगरपालिकेचे प्रशासकीय कार्य नव्या तंत्रज्ञानाचा अंगिकार करुन अधिक सक्षमतेने लोकाभिमुख करा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे ५१वे आयुक्त आणि १४वे प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत असलेले डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
रविवारी २ मार्च २०२५ रोजी नागपूर महानगरपालिकेचा ७४वा स्थापना दिवस सोहळा उत्साहात साजरा झाला. ७५वर्षातील पदार्पण नागपूर महानगरपालिकेचा अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. मनपाच्या ७४व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त मनपा मुख्यालयातील हिरवळीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, विनोद जाधव, मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, गणेश राठोड, अशोक गराटे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासावर प्रकाश टाकला. २ मार्च १९५१ रोजी स्थापना झालेली नागपूर महानगरपालिका ‘पौर जन हिताय’ हे ब्रिद घेऊन ७४ वर्षांपासून अविरत जनसेवेचे कार्य करीत आहे. या महानगरपालिकेचे प्रथम महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी केंद्र शासनात महत्वाची भूमिका पार पाडली पुढे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शहराच्या गौरवात भर पाडली. नागपूर शहराचे दोनदा महापौरपद भूषविणारे श्री. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नागपूर महानगरपालिका अभिमान वाढविणारा दैदिप्यमान इतिहास आहे, असेही गौरवोद्गार आयुक्तांनी काढले.
नागपूर शहराचा भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या चौफेर विकास होत आहे. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संकल्पानुसार २०४७ पर्यंत आपला देश विकसीत भारत म्हणून नावलौकीक करणार आहे. या कार्यात शहराला विकासाचे ‘ग्रोथ इंजीन’ बनवून नागपूर महानगरपालिकेचे देखील योगदान असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात मनपाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आयुक्तांनी व्यक्त केली. यासाठी विभागांना बळकट करुन उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करावे लागतील. भविष्यातील ‘रोड मॅप’ तयार करावा लागणार आहे. ‘एआय’ तसेच नव्या तंत्रज्ञानाचा कामामध्ये अंतर्भाव करुन क्षमता बांधणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचेही आयुक्त म्हणाले. मनपाच्या अमृत महोत्सवात नवीन नगर भवन अर्थात टाउन हॉलचे कार्य पूर्ण होईल, असा विश्वासही डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. मनपा स्थापनेच्या अमृत महोत्सवामध्ये वर्षभरात प्रत्येक विभागाने किमान एकतरी लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अन्य मान्यवरांनी नागपूर महानगरपालिकेचे प्रथम महापौर बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. ७५व्या वर्षातील पदार्पणानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. आकाशात फुगे सोडून आनंद साजरा करण्यात आला. मनपा जयताळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व जयोस्तूते हे गीत सादर केले. नारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी मंगळा गौरी चे सादरीकरण केले. कार्यक्रमात ग्रीन व्हिजिलचे कौस्तभ चॅटर्जी, तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंधडा, मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे श्री. सुरेश रेवतकर यांची विशेष उपस्थिती होती.
स्थानपा दिनाच्या अनुषंगाने जनतेच्या वतीने ग्रीन व्हिजिलचे कौस्तभ चॅटर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. नागपूर शहरातील महत्वाची संस्था असल्यामुळे नागरिक म्हणून प्रत्येक कामात नागपूर महानगरपालिकेने काम करावी अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंसेवी संस्था म्हणून मनपाशी थेट संबंध आल्यानंतर येथील कामाचा व्याप, अहोरात्र घडणारे सेवाकार्य आणि त्यातही नागरिकांच्या रोषाचा होणारा सामना हे सर्व पाहताना नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव झाल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरणीय क्षेत्रात शहरात होत असलेल्या कामाबाबत श्री. चॅटर्जी यांनी नागपूर महानगरपालिकेचे अभिनंदनही केले.
स्थापना दिवस कार्यक्रमाच्या अनुषंगाने मनपा मुख्यालयात ‘साज’ ग्रुपच्या ‘ऑर्केस्टॉ’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कलावंतांसोबतच मनपाचे उपायुक्त श्री. विजय देशमुख व अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी गीत सादर केले. डॉ.बहिरवार यांनी मनपा प्रशासकीय इमारतीचे स्वत: साकारलेले पोर्टेट आयुक्तांना भेट दिले.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले व आभार उपायुक्त श्रीमती विजया बनकर यांनी मानले. या प्रसंगी डॉ. दिपक सेलोकर, सहा. आयुक्त श्री. श्याम कापसे, राजकुमार मेश्राम,डॉ.पियुष आंबुलकर, मनपाचे कार्यकारी अभियंता व इतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.