मुंबई: राज्यातील मुक्त विदयापीठ आणि इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत टकले यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
दरम्यान या लक्षवेधीवर मराठी भाषा विभाग आणि वित्त विभागाचे सचिव यांची आणि आमदार हेमंत टकले यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.
या लक्षवेधीमध्ये आमदार हेमंत टकले यांनी दक्षिण भारतातील सर्व राज्यांनी त्यांच्या भाषेकरिता असे कायदे पारीत केलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठी शिक्षण कायदा (The Marathi Learning Act) संम्मत करा. याशिवाय मराठी भाषा विभागाची पुर्नरचना करून कामकाज अधिक प्रभावी होण्यासाठी सचिव यांच्या ऐवजी भाषेतील तज्ज्ञ व्यक्तींची संचालक म्हणून नेमणूक करावी अशी मागणीही केली.
मराठी भाषा विभागासाठी निधीची तरतूद अत्यंत कमी आहे. ज्याप्रमाणे सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागासाठी प्रत्येकी १०० कोटींची तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा विभागाला १०० कोटींची तरतूद करण्यात यावी.
मराठी विद्यापीठाची निर्मिती, मराठी भाषा भवनाचे कामकाज जलद व्हावे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी पुढची पावले त्वरीत टाकावीत. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे काल निधन झाले आहे. त्यांच्या नावाने एक चांगला उपक्रम सुरु करावा.
अशा आग्रही मागण्या आमदार हेमंत टकले यांनी सभागृहात मांडल्या.कै. गंगाधर पानतावणे यांच्या नावे उपक्रम राबवण्यासाठी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेवू असे आश्वासनही विनोद तावडे यांनी यावेळी दिले.