“ही दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक फार महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात जर सत्ता परिवर्तन झाले तर केंद्रात पण सत्ता परिवर्तन होणार. ही तत्वांची लढाई आहे. नागपूर दोन विचारधारेने जोडलेले शहर आहे. डॉ. आशिष देशमुख यांनी अंगीकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी व इतर समाजसुधारकांची विचारधारा एकीकडे व आरएसएसची विचारधारा दुसरीकडे. डॉ. आशिष देशमुख यांना निवडून परिवर्तन करा. आपली लढाई ही मुख्यमंत्र्यांशी नाही, त्यांच्या विचारधारेशी आहे. लहान पक्षांना मतदान करून मत विभागणी करू नका.
भाजपने देशाचे वाटोळे केले. बेरोजगारी वाढली. मार्केटिंग करून भाजपा लोकांची दिशाभूल करीत आहे. दलित व मागासवर्गीयांनी कॉंग्रेसला मतदान करावे. रिझर्वेशन मिळू नये म्हणून भाजपा प्रयत्न करीत आहे. सरकारी संस्था खाजगीकरणाचे भाजपचे काम सुरु आहे. संविधान वाचविण्यासाठी जागे व्हा. एकत्र या. बाबासाहेबांची विचारधारा अविरत चालू राहील. सर्व जनतेने याकडे लक्ष द्यावे. जीडीपी कमी झाली. महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या मागे पडला आहे. उद्योग नाही. गुंतवणूक नाही. फडणवीसांच्या काळात नवीन कारखाने नाहीत, रोजगार नाही. व्यवसाय बंद होत आहेत. सत्ता परिवर्तन करा. डॉ. आशिष देशमुख यांन निवडून द्या”, असे आवाहन श्री. मल्लिकार्जुन खड्गे यांनी केले. जाटतरोडी येथे कॉंग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले,”डॉ. आशिष देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करू शकतात म्हणून यांना उमेदवारी दिली आहे. मिहान कॉंग्रेसने आणला. परंतु तिथे उद्योगधंदे नाहीत. बेरोजगारी वाढली आहे. दिशाभूल करणाऱ्या भाजपचा पराभव करा.”
डॉ. आशिष देशमुख यांनी प्रास्ताविकात भाजपचा खरपूस समाचार घेतला. संधी मिळाल्यास या क्षेत्राचा कायापालट करीन, असे ते म्हणाले.
यावेळी मंचावर श्री. रणजीत देशमुख, अनिस अहमद, आशिष दुवा, संत भजनाराम, किशोर गजभिये, अलका कांबळे, प्रफुल्ल गुडधे, दिलीप पनकुले, अतुल लोंढे आदि उपस्थित होते.