– जिल्हयातील प्रत्येक घरात होणार सर्वेक्षण
गडचिरोली– कोविड-19 विषाणूचा प्रादुभाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्हयात होत आहेत. यासाठी राज्य शासनाची महत्वपुर्ण “माझे कुटुंब-माझी जबाबदारी”मोहिम प्रत्येक नागरिकाने व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी यशस्वी करा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. जिल्हयातील नागरिकांसह सर्व लोक प्रतिनिधींच्या सहकार्याने व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने दि.15 सप्टेंबर पासून ते 25 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नविन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तिंना प्रेरीत करणे, आरोग्य शिक्षण साधने हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. जिल्हयातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून आरोग्य तपासणी, त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे, आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, कोविड-19 चे संशयीत रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्या विषयी जागृती करणे या बाबी मोहिमेत राबविल्या जाणार आहेत.
कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करण आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्विकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी गडचिरोली जिल्हयात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम वैयक्तिक, कैटुंबिक तसेच सार्वजनिक जिवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत अशी अत्यंत आवश्यक त्रिसुत्रीवर मोहिम आधारित असणार आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा नियमित व योग्य वापर करणे व वारंवार हात स्वच्छ धूणे तसेच निर्जंतुकीकरणचा योग्य वापर करणे या बाबातचे महत्व नागरिकांना या मोहिमेत पटवून दिले जाणार आहेत.
वैयक्तिक स्तरावर, कैटुंबिक स्तरावर, सोसायटी-वसाहतीमध्ये घ्यावयाची काळजी, दुकाने-मंडी-मॉल्समध्ये खरेदीसाठी जातांना, कार्यस्थळी-कार्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी व खाजगी-सार्वजनिकरित्या प्रवास करतांना घ्यावयाची काळजी या बाबतची सविस्तर माहिती नागरिकांना या मोहिमेद्वारे देण्यात येणार आहे.
*मोहिमेची व्याप्ती* : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम जिल्हयातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाईल. या मोहिमेंतर्गत सर्व शहरे, गावे, वाडी, तांडे, पाडे इत्यादी मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाईल.
*प्रत्येक कुटुंबासाठी महत्वाच्या बाबी* : रोज सकाळी शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी ऑक्सीमीटरद्वारे मोजून घ्यावी. हे आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे. मास्कचा सदैव वापर करावा, मास्क काढून ठेवू नये, याबाबत कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविषयी काळजी घ्यावी. सॅनिटाझरची लहान बाटली सदैव सोबत बाळगावी. त्याचा गरजेनुसार उपयोग करत रहावा. हाताची नियमितपणे स्वच्छता राखावी. साबणाने वारंवार हात स्वच्छ धुवावेत. पुरेसा आहार, पुरेशी झोप, व्यायाम, योग, प्राणायम आदिव्दारे प्रतिकारशक्ती टिकवून ठेवावी. जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्व, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्त पदार्थ जेवणात असावेत. कुटुंबात वावरतांना कोरोना विषयक मार्गदर्शक तत्वांचे, सुचनांचे पालन करा. घरातील लहान मुले, जेष्ठ नागरिक यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे स्वच्छ धूवून ठेवावेत. नंतरच त्याचा आहारात उपयोग करावा.
नातेवाईक मित्रांकडे जाणे टाळावे. बाजारपेठेत खरेदीला जातांना काळजी घ्यावी. सुरक्षित अंतर पाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा. कार्यालयात शक्यतो सुरक्षित अंतर ठेवूनच बैठक व्यवस्था करावी. कर्मचाऱ्यांना शक्यतो वर्क फ्रॉम होमचा पर्याय द्यावा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करत असतांना मौन राखावे. सहप्रवाशांशी विनाकारण बोलू नये. सार्वजनिक वाहनात एक आसनावर एकाच व्यक्तीने आसनस्थ व्हावे. वाहनांमध्ये गर्दी करून दाटीवाटीने प्रवास करू नये. गर्दीचा प्रवास टाळावा. कमीत कमी ठिकाणी स्पर्श करावा. या सर्व बाबी जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे. जोवर कोविड विषाणूवर लस सापडत नाही तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करून कोरोना साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी माझे कुंटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
*प्रत्येक कुटुंबाचे होणार निरीक्षण* : जिल्हयातील प्रत्येक कुटुंबातच या मोहिमेतून घरोघरी जावून आरोग्य पथकाद्वारे निरीक्षणे नोंदविली जाणार आहेत. जिल्हयात हाजारो पथके नेमून प्रती पथक 50 कुटुंब वाटप केली जाणार आहेत. या पथकाकडून प्रत्येक घरावर स्टीकर लावण्यात येईल. तसेच ऑक्सीमीटरने ऑक्सीजन, थर्मोमीटरने ताप व घरातील माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये तीव्र जोखमीचे व्यक्ती कोण कोण आहेत, आजार आहेत काय, तसेच प्रवासाबाबत माहिती घेतली जाणार आहे. यासाठी सर्व नागरिकांनी आपली अचूक माहिती आलेल्या पथकातील सदस्यांना द्यावी असे आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
*व्यक्ती व संस्थांसाठी बक्षिस योजनेचाही समावेश* : विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांचेसाठी निबंध, पोस्टर्स, शॉटर्स फिल्म स्पर्धा याबाबत स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर 5 हजार, 3 हजार व 2 हजार असे बक्षिस असणार आहे. संस्थांच्या सहभागासाठीही जिल्हास्तरावर 50, 30 व 20 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. यासाठी संस्थांना गृहभेटी, कोविड तपासण्या करणे, मास्कचे वाटप करणे, सारी तसेच आयएलआय रूग्ण शोधणे अशी कामे असतील. याबाबत सविस्तर जाहीरात शासनस्तरावरून देण्यात येणार आहे.