नागपूर: बुटीबोरी उपविभागीय पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेला येथील पूर्ती साखर कारखान्यातील (मानस ऍग्रो युनिट १ मधील)बायोगॅस मोलासेस उत्पादन टॅंक दुरुस्ती चे काम सुरू असतांना झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दि.१ आगस्ट रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास बेला पोलिस स्टेशन अंर्तगत घडली.सचिन वाघमारे (२७),मंगेश प्रभाकर नौकरकर (२३),वासुदेव लडी (३४),प्रफुल पांडुरंग मुन (२५),लीलाधर वामन शेंडे सर्व राहणार वडगाव बेला असे या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, सर्व मृतक हे बेला येथील पूर्ती साखर कारखान्यातील कर्मचारी आहेत.आज मानस ऍग्रो युनिट क्र.१ मधील ६० लाख लिटर क्षमता असलेल्या बायोगॅस उत्पादन टॅंक च्या दुरुस्ती चे काम सुरू होते.दरम्यान वेल्डिंग सुरू असतांना टॅंक मधील बायोगॅस लिकेज असल्याने वेल्डिंगच्या ठिणगी लिकेज गॅस च्या संपर्कात आल्याने टॅंक मध्ये जोरदार स्फोट झाला.त्यात दोन कामगार हे टॅंक वरून खाली फेकल्या गेल्याने तर गेले तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण परिसर त्यामुळे हादरला गेला.
परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली परंतु कामगारांना वाचविण्यात त्यांना अपयश आले.घटनास्थळी कामगार यांच्यात कारखान्याच्या व्यवस्थापणाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आल्याने त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण चे पोलिस अधीक्षक राकेश ओला,बेला पोलिस निरीक्षक शिवाजी भांडवलकर तसेच बुटीबोरीचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून तणावग्रस्त परिस्थितीवर समजुतीने नियंत्रणात आणली.घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.पुढील तपास पोलिस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनात बेला पोलिस करीत आहेत.
महत्वाची बाब असी की या घटनेत मृत्यू पावलेले सर्व कामगार हे रोजमजुरीने काम करणारे कामगार होते.कारखाण्यासमोर संजय इंगळे नामक व्यक्तीचा फेब्रिकेशन वर्कचा व्यवसाय असून तो कंपनी अधिकाऱयांसी आपले हितसंबंध साधून छोटे मोठे काम ठेका पद्धतीने घेत होता. स्फोट झालेली टॅंकच्या दुरुस्तीचे काम देखील इंगळे यानेच घेतले होते. या दुरुस्तीच्या कामावर मृत्यू झालेले कामगार काम करत असतांना ही घटना घडली.इंगळे यांच्याकडे कोणत्याही स्वरूपाचा कामाविषयीचा परवाना नाही असी चर्चा असून या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न विचारल्या जात आहे.घटना घडल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने सर्व कामगारांना सुट्टी देऊन पाचही मृतदेह बेवारस सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याचे काही कामगारांचे म्हणणे आहे.
यामुळे या घटनेबाबत शंका उपस्थित केली जात असून सदर कामगारांना कोणत्याही कामगार योजनेत समाविष्ट करण्यात आले नव्हते.त्यामुळे मृतकांच्या परिवारांना या घटनेचा मोबदला मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.बातमी लिहितोवर कारखान्यातील एकही अधिकारी घटनास्थळी हजर नव्हता त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.