५०० संकल्पनांचा समावेश, २५ हजार दर्शकांची राहणार उपस्थिती, तज्ज्ञ, सेलिब्रिटींचे लाभणार मार्गदर्शन, स्टॉल्सच्या माध्यमातून मिळणार शासकीय योजनांची माहिती, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
नागपूर : विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांमध्ये असलेल्या नवनवीन संकल्पनांना पंख देण्यासाठी, त्यांच्यातील नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि उत्तम कल्पनांना ‘स्टार्ट अप’ देऊन उद्योग उभारणीच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आणि बँकांच्या मदतीने आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या ‘इनोव्हेशन पर्व’चे नागपुरात २३ आणि २४ ऑगस्ट रोजी मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे.
भावी शास्त्रज्ञ तयार करण्याच्या दृष्टीने आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’ हे ‘हॅकॉथॉन’, ‘स्टार्ट अप’ आणि ‘द ॲसिलरेट’ अशा तीन भागात विभागले आहे. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजतापासून ‘हॅकॉथॉन’ला सुरुवात राहील. हॅकॉथॉनच्या माध्यमातून ‘मेयर्स इनोव्हेशन कौन्सिल’ने सुचविलेल्या शासनाच्या विविध विभागातील प्रश्न आणि समस्यांवर उपाय सुचविणारे सादरीकरण विद्यार्थी करतील. यासाठी सुमारे ५०० च्या वर नोंदणी झाल्या असून ‘इनोव्हेशन पर्व’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या विविध झोनमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. संबंधित झोनमध्ये विद्यार्थी परिक्षक मंडळासमोर प्रकल्पांचे सादरीकरण करतील.
२४ ऑग़स्ट रोजी आयोजित ‘स्टार्ट अप फेस्ट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या संकल्पनांना उद्योगामध्ये कशाप्रकारे परिवर्तीत करता येईल, याबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. स्टार्ट अपच्या माध्यमातून आपल्या उद्योगाची यशस्वीपणे उभारणी करणाऱ्या उद्योजकांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
‘द ॲसिलरेट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उद्योगाला आर्थिक मदत कशी देता येईल, शासनाच्या कुठल्या योजनांचा लाभ घेता येईल, बँकांचे काय सहकार्य मिळू शकते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. ५०० च्या वर नवसंकल्पनांचे सादरीकरण, २५ हजार नागरिकांचा सहभाग हे ‘इनोव्हेशन पर्व’चे वैशिष्ट्य राहणार आहे.
२३ ऑगस्टला शानदार उद्घाटन सोहळा
‘इनोव्हेशन पर्व’चा शानदार उद्घाटन सोहळा २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होईल. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री परिणय झुके यांची उपस्थिती राहील. खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, बसपाच्या पक्षनेत्या वैशाली नारनवरे, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्ष नेते किशोर कुमेरिरया, मंगळवारी झोनच्या सभापती गार्गी चोपडा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.
२४ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांची उपस्थिती
२४ ऑगस्ट रोजी आयोजित स्टार्ट अप फेस्ट च्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहील. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, यू-ट्यूब निर्माते रणवीर अल्लाबाडिया, एमएचआरडीचे इनोव्हेशन डायरेक्टर मोहित गणवीर, नॅशनल प्रो-ॲथॅलेट गौरव तनेजा, सिरीयल आंतरप्रीनर छेट जैन यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील.
दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
‘इनोव्हेशन पर्व’ निमित्ताने २३ आणि २४ ऑगस्ट या दोन्ही दिवशी नव शास्त्रज्ञांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. इनोव्हेशन, इनोव्हेशनच्या माध्यमातून आलेल्या संकल्पनांचा शाश्वत विकासात उपयोग, नावीन्यपूर्ण खेळ, स्टार्ट-अपच्या सक्सेस स्टोरीज आदींची मेजवानी मिळणार आहे. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० दरम्यान ‘सोशल मीडिया फॅन फेस्ट’ हा विशेष कार्यक्रम राहणार आहे. उपस्थितांचे मनोरंजन करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांची उपस्थिती आकर्षण ठरणार आहे.
स्टॉल्सवरून मिळणार माहिती
‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने शासनाच्या विविध प्रकल्पांची आणि विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. नागपूर मेट्रोच्या स्टॉलवरून ‘महाकार्ड’ आणि नागपूर मेट्रोच्या फीडर सर्व्हिस विषयी माहिती उपलब्ध होणार आहे. महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेले ॲप, त्यावरील नोंदणी पद्धती आणि महावितरणने नुकतेच लॉन्च केलेले ई-वॉलेट याबद्दल महावितरणच्या स्टॉलवरून उपस्थितांना माहिती मिळेल. यासोबतच महात्मा फुले विकास महामंडळ, ओबीसी महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र आदींचे स्टॉल्स कार्यक्रम स्थळी राहणार असून त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तेथे उपलब्ध असेल.
जागतिक पातळीवर दखल
फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या ‘हॅकॉथॉन’ आणि मार्च महिन्यात झालेल्या ‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड या उपक्रमांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. अशा प्रकारचा हा अभिनव उपक्रम जागतिक पातळीवर जगातील प्रमुख पाच शहरांमध्ये राबविण्यात येईल, असे जी-कॉमच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
सहभागी होण्याचे आवाहन
कुठल्याही प्रश्नांकडे समस्या म्हणून न पाहता त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केल्यास नवा मार्ग मिळू शकतो, ही शिकवण देणारे ‘इनोव्हेशन पर्व’ हा नागपूरकरांसाठी गौरवास्पद उपक्रम आहे. जागतिक पातळीवरच्या लोकांशी हितगूज करण्याची आणि विद्यार्थ्यांनी शोधलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना अनुभवण्याची सुवर्ण संधी आहे. या संधीचा लाभ नागपूरकरांनी घ्यावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार, इनोव्हेशन पर्वचे नोडल अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू आणि इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर यांनी केले आहे.