वडीगोद्री (जालना) : मराठा आरक्षणसंदर्भातील मागण्या मान्य केल्यानंतर सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत, उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली असून आज सकाळी नाकातून रक्त आले.जरांगे यांना या उपोषणात त्रास वाढत असल्याची परिस्थिती आहे. प्रकृती खालवली असली तरी जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा बांधव व महिला या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. सर्वांनी पाणी व उपचार घेण्याची विनवणी केली, जरांगे पाटील यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे जरांगे यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्त आल्याने पुन्हा आरोग्य पथकातील सिव्हील सर्जन डॉ. पाटील यांनी तपासणी करण्यास विनंती केली. मात्र जरांगे यांनी हातवारे करून नकार दिला.
सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी घेतली आहे. माझा जीव गेल्यावर महाराष्ट्रात सरकार राहील का ? महाराष्ट्रात दुसरी श्रीलंका दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.