मनापासोबत पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सहभाग
चंद्रपूर : नायलॉन मांजाला पूर्णतः हद्दपार करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पावले उचलली असून, नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी झोननिहाय ३ पथक गठीत करण्यात आले आहे. यात मनापासोबत पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सहभाग राहणार आहे.
नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेत गठीत पथकाची आढावा बैठक अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रभारी झोन सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, प्रभारी झोन सहायक आयुक्त राहुल पंचबुद्धे, स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक, शहर आणि रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, इको प्रोचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
मकर संक्रांती सणाच्या वेळी प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास मनपाने पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अन्वये प्रतिबंध केला आहे. विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी आढावा बैठकीत दिले.
नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अशा धाग्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. पतंग उडवितांना केलेल्या माजांच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवीत हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता असल्याने, याबाबतची आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नायलॉन मांजाच्या धाग्याच्या दुष्परिणामांबाबत शाळा,महाविद्यालय तसेच लोकांमध्ये जनजागृती करावी. तसेच सर्व नागरिकांनी निर्देशाचे पालन करावे, असेही सूचित केले.
“हा नायलॉन मांजा नाही” : दुकानदारांकडून घ्या पावती
कोणत्याही दुकानातून मांजा खरेदी करताना तो नायलॉनचा नाही, याची खात्री करून घ्यावी. तसेच खरेदीच्या बिलावर “हा नायलॉन मांजा नाही” असे दुकानदारांनी नमूद करून द्यावे, अशा सूचनाही अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिल्या.