नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे शहरातील महिला उद्योजिका, बचत गटातील महिलांच्या कौशल्याला वाव मिळवून देण्याच्या हेतूने महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते ११ मार्च २०२५ या कालावधीमध्ये रेशीमबाग मैदानात महिला उद्योजिका मेळावा घेण्यात येणार आहे. बुधवार ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन होईल. ही माहिती महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे उपस्थित होत्या.
मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन महामार्ग विभाग मंत्री श्री. नितीन गडकरी व राज्याचे महसूल मंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर भेट देणार आहे, असे ही आयुक्तांनी सांगितले.
नागपूर शहरातील महिला उद्योजिकांना वाव मिळावा, त्यांच्या गृहोद्योगातील हस्त कौशल्याचा विकास व्हावा, त्यांच्या पाक कौशल्याला चालना मिळावी तसेच बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळव्यामध्ये ५ ते ११ मार्च या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. याशिवाय रेशीमबाग मैदानात विविध महिला उद्योजिका, बचत गटाच्या महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीकरिता २५० स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मेळाव्यात मनपातर्फे महिलांच्या सक्षमीकरणाकरीता सुरु असलेल्या विविध योजनांच्या पात्र लाभार्थांना तसेच दिव्यांग महिलांना धनादेश वितरीत करण्यात येईल.
५ मार्च रोजी महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटनानंतर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमामध्ये श्री. सारंग जोशी, मुकुल पांडे, निकेता जोशी यांच्यासह नागपूर शहरातील यशस्वी वाद्यवृंद हे आपली कला सादर करतील. कार्यक्रमाचे निवेदन वृषाली देशपांडे ह्या करतील. ६ मार्च रोजी श्री. प्रसन्न जोशी आणि त्यांच्या चमूद्वारे गझल संध्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाईल. ७ मार्च रोजी श्री. सचिन डोंगरे ग्रुप व अवंती काटे ग्रुप यांचे नृत्य रंग कार्यक्रम सादर केले जाणार आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका स्थापनेच्या अमृत महोत्सवा निमित्त फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. ९ मार्च रोजी हृषिकेश रानडे व त्यांच्या चमूचे ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आले आहे. १० मार्च रोजी श्री. राजेश चिटणीस आणि त्यांच्या ग्रुपद्वारे हिंदी मराठी गाण्यांचा स्वरजल्लोष कार्यक्रम तसेच कॉमेडी तडका कार्यक्रम सादर केले जाईल. ११ मार्च रोजी निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम श्रेया खराबे व त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात येणार आहे. ११ मार्च रोजी महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोप होईल.