नागपूर: फ्लाय ॲशच्या पुनर्वापर प्रक्रियेसाठी नागपूर महानगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन डॉ. रामनाथ सोनवणे यांनी दिले. महाजेम्स आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने उद्योग भवनातील एमआयडीसीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये फ्लाय ॲश पुनर्वापर प्रक्रिया या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राहुल वानखेडे, डीआयसीचे संयुक्त संचालक ए.पी.धर्माधिकारी, ऊर्जामंत्री यांचे तांत्रिकी सल्लागार शेखर अमीन आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सोनवणे म्हणाले, नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व सीमेंट रस्त्यांच्या कामात यानंतर फ्लाय ॲशचा वापर करण्यात येईल. मनपाच्या नगररचना विभागाद्वारा शहरातील कोणत्याही बांधकामाला मंजुरी देताना फ्लाय ॲशचा वापर हा बंधनकारक असेल. सन ९१-९२ च्या काळात ‘पॉवर कट’चा सामना करावा लागला होता. त्यानंतर ऊर्जानिर्मितीच्या दृष्टिकोनातून कार्य करताना धोरणात्मक निर्णय शासनाला घ्यावे लागले. ऊर्जानिर्मितीवर कार्य करणाऱ्या संस्था पुढे आल्या होत्या. कोळशापासून ऊर्जानिर्मिती करताना त्यातून ४० टक्के फ्लाय ॲश तयार होते. २००५ मध्ये या ॲशचा वापर करण्यात यावा, असा शासनाने विचार केला होता. त्यावर अंमलबजावणी करत सन २००७-०८ मध्ये महाराष्ट्र सरकारने बांधकामासाठी फ्लॉय ॲशचा वापर बंधनकारक केला. या फ्लाय ॲशपासून ऊर्जानिर्मितीसोबतच वाळू तयार करण्याचेही धोरण शासनाने आखले असून यामुळे नद्यांमधून वाळूचा उपसा कमी होईल आणि वाळुचे दर कमी होतील. वाळूच्या दरापाठोपाठ बांधकामाचे जे दर वाढले आहे, तेसुद्धा कमी होतील. फ्लाय ॲश पुनर्वापर प्रक्रियेत नागपूर शहर हे देशातील प्रथम क्रमांकावर आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राहुल वानखेडे म्हणाले, मागील दोन वर्षांपासून फ्लाय ॲश संदर्भातील तक्रारी सातत्याने येत होत्या. आता फ्लाय ॲश पुनर्वापरासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. या ॲशपासून विटा बनविण्यात येत असून हायवेवरील सीमेंटच्या रस्त्यांसाठीही ॲशचा वापर करता येतो. यापुढेही फ्लाय ॲशपासून विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने लागेल ती मदत करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
डीआयसीचे संयुक्त संचालक ए.पी. धर्माधिकारी यांनी केंद्र शासनाच्या योजनेअतंर्गत फ्लाय ॲशच्या पुनर्वापरासाठी काय सखोल प्रयत्न करता येईल याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगधंद्यांना चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात वर्षाकाठी ८० लाख टन फ्लाय ॲश तयार होत आहे. या कार्यशाळेतून ॲशच्या पुनर्वापराबद्दल त्यापुढे जाऊन विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.
नागपूर महानगरपालिका आणि महाजनको ॲश मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आता या दोन्ही संस्था फ्लाय ॲश वापरासंदर्भात सोबत काम करणार आहे. त्याच्या प्रसारासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत ‘महाराष्ट्र स्टेट ॲश पॉलिसी’ याविषयावर सुधीर पालीवाल, ‘प्रॅक्टीकल ॲप्लीकेशन ऑफ युटीलॉझेन्स ऑफ फ्लाय ॲश इन रोड कन्सट्रक्शन ॲण्ड सॉईल स्टॅबीलॉयझेशन’ या विषयावर ए.एम सिंगारे, ‘यूज ऑफ जियोसिंथेटिक क्ले लायनर्स इन लायनिंग ॲप्लिकेशन्स इन सिव्हील कन्स्ट्रक्शन’ या विषयावर अमित बारटक्के यांचे व्याखाने झालीत.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन मिलिंद रहाटगावकर यांनी केले.
कार्यक्रमाला नागपूर महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, दिलीप जामगडे, कार्यकारी अभियंता प्रशांत देशपांडे, नगररचना विभागाचे अधिकारी, महाजेम्स आणि महाजनकोचे अधिकारी उपस्थित होते.