Published On : Wed, Jul 25th, 2018

मराठा समाजातील संतापाची लाट साम, दाम, दंड, भेद नीतीनेही रोखता येणार नाही – उद्धव ठाकरे

Advertisement

मुंबई : आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाज्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामानातील अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. “गोदावरीतील जलसमाधीचे पाणी संतापाची लाट बनून मुख्यमंत्र्यांच्या अंगावर उसळले आहे. ही संतापाची लाट साम, दाम, दंड, भेद नीतीनेही रोखता येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण हवे आहे.

सरकार म्हणते न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते आता निर्णय घेऊ शकत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे खरे असले तरी न्यायालयाची ढाल सरकार किती वेळा पुढे करणार आहे?’ असे खडे बोल त्यांनी भाजपाला सुनावले आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविणे हेच तर सरकारचे काम आहे. मराठा क्रांतीसाठी पहिले बलिदान शेवटी एका शिवसैनिकानेच दिले. हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, पण असे पाऊल आता कोणी उचलू नये. असे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केले आहे.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आजचा सामना संपादकीय….

दुधात मिठाचा खडा पडावा असे महाराष्ट्रात घडले आहे. मराठा समाजाचे क्रांतिकारी आंदोलन भडकले व त्यात काकासाहेब शिंदे यांची आहुती पडली आहे. काकासाहेब शिंदे यांनी सरकारच्या भूमिकेविरुद्ध संभाजीनगरच्या गोदावरी पात्रात उडी मारून जलसमाधी घेतली आहे. गोदावरीच्या पात्रात पडलेली ही ठिणगी आहे. महाराष्ट्राचे सामाजिक मन अस्थिर आणि अस्वस्थ करणारा हा प्रकार आहे. कालपर्यंत आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो लाखोंचे मूक मोर्चे शांततेत काढणारा मराठा समाज आता रस्त्यावर उतरला व मूक मोर्चाचे रूपांतर ‘ठोक’ मोर्चात झाले.

त्यात काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडायला सुरुवात झाली आहे. हे असे का घडले याचा विचार सरकारने करायला हवा. संतप्त झालेल्या मराठा समाजाने एस.टी. व इतर वाहनांची तोडफोड केली. राज्यात वाहतूक अडवली. ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. मुख्यमंत्री पिंपरीत एका कार्यक्रमासाठी गेले. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंनाही थोडी धक्काबुक्की झाली. खैरे हे काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्कारास गेले होते. तेथे हे प्रकार घडले.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या शासकीय महापूजेस मुख्यमंत्री गेले नाहीत. लाखो वारकरी पायी पोहोचले, पण इतका सुरक्षेचा ‘झेड प्लस’ फौजफाटा असूनही पंढरपुरात मुख्यमंत्री पोहोचले नाहीत, कारण मराठा समाजाने तसा इशारा दिला होता. काहीतरी घातपात होईल. वारकऱ्यांच्या दिंडीत साप वगैरे सोडून गोंधळ माजवला जाईल म्हणून पंढरपुरात जाण्याचे टाळले, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. तो न पटणारा आहे. मुख्यमंत्री पंढरपुरात गेले नाहीत. म्हणून विठूमाऊलीने त्यांना आशीर्वाद दिले असे झाले नाही.

काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतलेल्या गोदावरीचे पाणी संतापाची लाट बनून मुख्यमंत्र्यांच्या अंगावर उसळले आहे. ही संतापाची लाट साम, दाम, दंड, भेद नीतीनेही रोखता येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. सरकार म्हणते न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते आता निर्णय घेऊ शकत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे खरे असले तरी न्यायालयाची ढाल सरकार किती वेळा पुढे करणार आहे? हे सगळे अडथळे लवकरात लवकर दूर करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणे हेच तर सरकारचे काम आहे. राज्यात सत्तेवर येताच आरक्षणाच्या मार्गातले अडथळे दूर करू असे वचन भारतीय जनता पक्षाने दिले होते. आरक्षणाचे असे वचन भाजपने धनगर समाजालाही दिले होते, पण सर्व वचनांची आश्वासने झाली. त्या आश्वासनांना हरताळ फासून भाजप खुर्चीवर चिकटून बसला आहे.

धनगर समाजाचे आरक्षण-आंदोलन ज्यांनी ‘पेटवले’ ते महादेव जानकर भाजप सरकारात मंत्री आहेत. धनगरांचे प्रश्न तसेच अधांतरी आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी विरोधात असताना तोफा डागल्या ते विनायक मेटे, विनोद तावडे वगैरे मंडळी सरकारात आहेत, पण काकासाहेब शिंदे यांनी याप्रश्नी जलसमाधी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वाधिक आक्रमक झालेले सदाभाऊ खोत मंत्री आहेत व राजू शेट्टी यांच्या शेतकरी आंदोलनावर ते टीका करीत आहेत असा सगळा विरोधाभास सुरू आहे. महाराष्ट्रात भडकलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये.

जे असे करतील ते महाराष्ट्राचे द्रोही. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार व्हावा व त्यात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, पण पंतप्रधान मोदी हे स्वदेशात नाहीत. ते आफ्रिकेतील ‘रवांडा’ नामक देशात पोहोचले आहेत व रवांडातील जनतेला जगण्याचा व विकासाचा मार्ग काय ते सांगत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे कोणी ऐकेल काय? हा आता प्रश्न आहे. पुन्हा मुख्यमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. आंदोलनामुळे प्रश्न सुटावेत, पण राज्याचे नुकसान होऊ नये. महाराष्ट्राचे मोठेपण त्यात नष्ट होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा लढा स्वराज्य व स्वातंत्र्यासाठीच होता. राज्यातील घडामोडी विषण्ण करणाऱ्या आहेत.

सरकार ‘बुलेट ट्रेन’ वगैरेंचे पंतप्रधानांचे स्वप्न साकारत आहे. पण मध्यमवर्गीय समाजाच्या स्वप्नात बुलेट ट्रेन नाही. लोकांनी आज एस. टी. गाडय़ा फोडल्या, उद्या तुमच्या बुलेट ट्रेनला आगी लावतील. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना आज रोखले जात आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. राज्य उत्तम सुरू असल्याचे हे लक्षण नाही. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात हे असेच घडत होते. काँग्रेसच्या मंत्र्यांना जागोजागी अडवले जात होते. त्यांच्या सभा उधळल्या जात होत्या. या उद्रेकातून पंडित नेहरू व यशवंतराव चव्हाणही सुटले नव्हते. तरीही ते रस्त्यावरून फिरत होते. काकासाहेब शिंदे हे शिवसैनिक होते. मराठा क्रांतीसाठी पहिले बलिदान शेवटी एका शिवसैनिकानेच दिले. हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, पण असे पाऊल आता कोणी उचलू नये. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

Advertisement