नाशिक: राज्यभरात गाजलेला मराठा क्रांती मोर्चा येत्या 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. या मोर्चासाठी राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत 210 सदस्य असणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या समितीमध्ये संभाजी राजे आणि उदयनराजे मुख्य मार्गदर्शक राहणार आहेत. त्यामुळे आता हा मोर्चा कितपत यशस्वी ठरतो आणि यावर सरकार काय भूमिका घेतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणानंतर विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात मराठ्यांचा मूकमोर्चा निघाला. या सर्वच मोर्चांना राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला. लाखोंच्या संख्येने मराठा समाजातील लोक एकत्र आले. आता मुंबईत हा मोर्चा धडकणार आहे. हा मोर्चा 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.
या समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही वंशज संभाजी राजे व उदयनराजे भोसले यांचा समावेश असून हा मराठा मोर्चा त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात येण्याचे आज समितीने ठरवले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील निवडक सदस्यांचा यात समावेश करण्यात आला असल्याची माहिती समन्वय समितीचे संयोजक करण गायकर यांनी सांगितले.
मुंबईतील मराठा मोर्चा काढण्याआधी सरकारबरोबर चर्चा करायची की नाही या संदर्भात 2 दिवसात ठरवणार असल्याचेदेखील यावेळी ते म्हणाले. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने मराठा समाजाने सामिल व्हावे, असे आवाहन करण्यासाठी काही शहरांमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.